कोकणातील आंबा, काजू बागायतदारांचा ‘वर्षा’वर मोर्चा; अवकाळी पाऊस, बदलत्या वातावरणामुळे संकट
कोकणामध्ये वारंवार पडणारा अवकाळी पाऊस आणि वातावरणात होणाऱया नियमित बदलांमुळे आंबा, काजू बागायतदार शेतकऱयांच्या हातातोंडाशी आलेले उत्पन्न धुळीस मिळाले आहे. मात्र राज्य सरकारकडून याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे बेजबाबदार सरकारच्या निषेधार्थ आणि नुकसानभरपाईसाठी आंबा, काजू बागायतदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर 15 मे रोजी धडक मोर्चा काढणार आहेत.
वातावरणातील बदलांमुळे आंबा, काजू बागायतदारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सरकारकडून नुकसानभरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकरी, बागायतदारांची आहे, मात्र याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या शिष्टमंडळाने नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेटही घेतली. यानंतर आता नुकसानभरपाईच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर मोर्चा नेण्याचा निर्णय आंबा, काजू बागायतदार शेतकऱयांनी घेतला आहे. या मोर्चाच्या माध्यमातून हजारो आंबा, काजू बागायतदार शेतकरी रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती शिवसेना भवन येथून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
मंगळवारी शिवसेना भवनात बैठक
मोर्चा यशस्वी करण्यासाठी मुंबई, ठाणे, कल्याण येथील कोकणवासीयांची तातडीची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मंगळवार, 12 मे रोजी सायंकाळी 6 वाजता शिवसेना भवन, दादर पश्चिम येथे घेण्यात येणार आहे. शिवसेना नेते, सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते आमदार ऍड. अनिल परब, शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू, उपनेते अरुण दुधडवकर, आमदार महेश सावंत, विभागप्रमुख रमेश कोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक होणार आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण कोकणवासीयांनी पदाधिकारी, पुरुष-महिला कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ – गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्री निवास
वेळ 15 मे रोजी सायंकाळी 4 वाजता
Comments are closed.