कोटक सिक्युरिटीजमध्ये ग्लिच आला अन् ट्रेडर कोट्यधीश बनला, 20 मिनिटात 1.75 कोटींची कमाई

मुंबई: कोटक सिक्युरिटीजच्या एका टेक्निकल ग्लिचमुळं गजानन राजगुरु नावाचा ट्रेडर कोट्यधीश बनला आहे. कोटक सिक्युरिटीजमध्ये टेक्निकल ग्लिचमुळं ट्रेडरच्या खात्यात 40 कोटी रुपयांचा मार्जिन मनी आला होता. या रकमेचं ट्रेडिंग करुन त्यानं 1.75 कोटी कमावले होते. हा प्रकार 2022 मध्ये घडला होता. यानंतर कंपनी हायकोर्टात गेली होती. मुंबई हायकोर्टानं 1.75 कोटी ट्रेडरकडे राहावेत, असा निर्णय दिला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 4 फेब्रुवारीला होणार आहे.

कोटक सिक्युरिटीजमधील टेक्निकल ग्लिचमुळं गजानन राजगुरु यांच्या खात्यात 40 कोटींचा मार्जिन मनी आला होता. राजगुरु यांनी 20  मिनिटात ट्रेडिंग केलं, सुरुवातीला त्यांना 54 लाखांचं नुकसान झालं. मात्र, पुढच्या काही मिनिटात मार्केट वाढलं आणि त्यांचा नफा 2.38 कोटी रुपयांचा झाला. सुरुवातीचं नुकसान वजा जाता त्यांनी 1.75 कोटी रुपये कमावले होते.

मार्जिन मनी म्हणजे काय?

मार्जिन मनी म्हणजे जी रक्कम एखाद्या ट्रेडरला शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यासाठी त्याच्या खात्यात जमा करतो किंवा ब्रोकरेजकडून उधारीवर घेतो. स्पष्ट पणे म्हणायचं तर मार्जिन मनी एका प्रकारची सिक्युरिटी किंवा एडव्हान्स असतो. ज्या अधारावर ट्रेडर त्याच्याकडे असलेल्या रकमेपेक्षा अधिक रकमेचे शेअर खरेदी करु शकतो किंवा विकू शकतो. उदा. एखाद्या ट्रेडरकडे 1 लाख रुपये असतील तर ब्रोकरेज 5 पट मार्जिन देतो तेव्हा तो 5 लाख रुपयांपर्यंत ट्रेडिंग करु शकतो.

कोटक सिक्युरिटीजला सिस्टीममधील ग्लिच समजला तेव्हा कंपनीनं तातडीनं 40 कोटींच्या मार्जिन मनीला माघारी घेतलं. याशिवाय ट्रेडरनं कमावलेल्या नफ्यावर देखील दावा ठोकला. कोटकच्या दाव्यानुसार मार्जिन मनी त्यांचा होता, त्यातून  झालेला नफा देखील त्यांचा होता. कंपनीनं याला अनजस्ट एनरिचमेंट म्हणजे चुकीच्या पद्धतीनं फायदा उठवल्याचं प्रकरण म्हटलं होतं.

डिसेंबर 2025 मध्ये बॉम्बे हायकोर्टानं कोटक सिक्युरिटीजचा दावा फेटाळला. चुकीनं क्रेडिट झालेल्या मार्जिन मनी तून मिळालेला नफा चुकीच्या पद्धतीनं फायदा उठवणं होऊ शकत नाही. कोर्टाच्या निर्णयानुसार मार्जिन मनी फक्त ट्रेडिंगची सुविधा देते, नफ्याची गॅरंटी देत नाही.

ट्रेडरनं मार्केटची जोखीम घेतली आणि त्याच्या ट्रेडिंग स्किलचा वापर केला, असं हायकोर्टानं म्हटलं. या प्रकरणात कोटक सिक्युरिटीजचं कोणतंही वित्तीय नुकसान झालं नाही. यामुळं नफा माघारी मिळवण्याचा प्रयत्न करणं कमजोर आधारावर अवलंबून असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं.

दरम्यान, या प्रकरणावर सुनावणी संपलेली नाही. कोटक सिक्युरिटीजनं या निर्णयाविरुद्ध अपील दाखल केलं आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी 4 फेब्रुवारी 2026 ला होणार आहे. या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देतं याकडे लक्ष लागलं आहे. ही केस ट्रेडर्स, ब्रोकरेज फर्म्स साठी महत्त्वाची ठरणार आहे. या प्रकरणात तंत्रज्ञान, जोखीम आणि कायदेशीर जबाबदाऱ्यांचा मर्यादा याबाबत प्रश्न निर्माण झालेत.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.