पुण्यातील प्रसिद्ध मराठी उद्योजक रवी पंडित यांचे निधन, फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत पटकावले होत

रवी पंडित यांचे निधन : भारतीय माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, ‘केपीआयटी टेक्नॉलॉजीज’चे (KPIT Technologies) संस्थापक आणि अध्यक्ष रवी पंडित (Ravi Pandit) यांचे आज, 8 मे रोजी पुण्यात निधन झाले. कंपनीने अधिकृत एक्स्चेंज फायलिंगद्वारे या वृत्ताची माहिती दिली आहे. त्यांच्या निधनाने केवळ पुणेच नव्हे, तर जागतिक ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

रवी पंडित यांचा प्रवास थक्क करणारा होता. व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या पंडित यांनी केवळ अंकगणितात रस न ठेवता तंत्रज्ञानाचे भविष्य ओळखले. त्यांनी एका छोट्या सीए प्रॅक्टिसला जागतिक स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या तंत्रज्ञान कंपनीत रूपांतरित केले. आज पुण्यातील मुख्यालय असलेली KPIT कंपनी त्यांच्या नेतृत्वाखाली 15 देशांमध्ये विस्तारली आहे. जग जेव्हा ‘स्मार्ट’ आणि ‘क्लीन’ वाहनांच्या कल्पनेपासून दूर होते, तेव्हा त्यांनी दशकांपूर्वीच ‘सॉफ्टवेअर-डिफाईन मोबिलिटी’चे महत्त्व ओळखून भारताला या क्षेत्रात जागतिक नकाशावर स्थान मिळवून दिले.

Ravi Pandit Passes Away: संस्था निर्माण आणि सामाजिक योगदान

रवी पंडित यांचे योगदान केवळ उद्योगापुरते मर्यादित नव्हते. ते देशातील अग्रगण्य व्यावसायिक सेवा कंपनी ‘किर्तने अँड पंडित’ चार्टर्ड अकाउंटंट्सचे अध्यक्ष होते. यासोबतच सामाजिक बांधीलकी म्हणून त्यांनी पुणे इंटरनॅशनल सेंटर (PIC) आणि ‘जनवाणी’ यांसारख्या संस्थांच्या स्थापनेत मोलाची भूमिका बजावली. ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम केले. गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्यांनी शाश्वत विकासासाठी धोरणात्मक संशोधनाला नेहमीच प्रोत्साहन दिले.

Ravi Pandit Passes Away: सुवर्णपदक विजेते आणि दूरदर्शी लेखक

शैक्षणिक क्षेत्रात रवी पंडित यांची कामगिरी देदीप्यमान होती. ते चार्टर्ड अकाउंटन्सीमध्ये सुवर्णपदक विजेते होते. त्यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित एमआयटी (MIT) स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून उच्च शिक्षण घेतले होते. त्यांच्या बौद्धिक क्षमतेमुळेच त्यांना इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीमध्ये ‘फेलो’ म्हणून गौरवण्यात आले होते. त्यांचे ‘लिपफ्रॉगिंग टू पोल-वॉल्टिंग’ हे पुस्तक आजही नवीन उद्योजकांसाठी दीपस्तंभाप्रमाणे कार्य करत आहे.

Ravi Pandit Passes Away: पुण्याच्या विकासाचा ध्यास

पुण्याला ‘स्मार्ट सिटी’ बनवण्यासाठी त्यांनी ‘जनवाणी’च्या माध्यमातून कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक वाहतूक यांसारख्या मूलभूत समस्यांवर उपाय शोधण्यासाठी काम केले. तंत्रज्ञान आणि मानवी मूल्ये यांचा संगम त्यांच्या प्रत्येक कार्यात दिसून येत असे. तसेच, फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत देखील त्यांनी स्थान पटकावले होते.

Ravi Pandit Passes Away: उद्योगविश्वाने संवेदनशील नेतृत्व गमावले : सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक्सवर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘केपीआयटी’चे सहसंस्थापक, अध्यक्ष, ज्येष्ठ सनदी लेखापाल आणि दूरदृष्टी असलेले उद्योजक रवी पंडित यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. माहिती तंत्रज्ञान, उद्योग, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवून अनेक संस्थांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. अभ्यासू नेतृत्व, विनम्र स्वभाव आणि समाजाभिमुख दृष्टिकोन यामुळे ते अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले. त्यांच्या निधनाने पुण्यासह संपूर्ण उद्योगविश्वाने एक दूरदर्शी आणि संवेदनशील नेतृत्व गमावले आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. पंडित कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा

Nashik TCS Case Nida Khan Arrested: साध्या वेशातील पोलीस, विनाचिन्हांकित गाड्या अन् रात्री छापा; TCS प्रकरणातील मास्टरमाइंड निदा खानच्या अटकेची इनसाईड स्टोरी

आणखी वाचा

Comments are closed.