आयपीएल 2026 मध्ये भाव न दिलेल्या खेळाडूने हॅट्ट्रीकसह घेतल्या 'इतक्या' विकेट्स, वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात वाचला!
आयपीएल २०२६ नंतर आता अनेक राज्यांच्या टी२० लीग सुरू आहेत. यामध्ये अनेकांनी विशेष कामगिरी करत लक्ष वेधले आहे. अशाच लीगमधील सामन्यात एका गोलंदाजाने हॅट्ट्रीकसह ६ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. मध्य प्रदेश प्रीमियर लीगमध्ये रॉयल निमार ईगल्स आणि भोपाळ लेपर्ड्स यांच्यात सामना खेळला गेला, ज्यामध्ये ईगल्सने ८ विकेट्सने विजय मिळवला. त्यांच्या या विजयात २८ वर्षीय डावखुरा फिरकीपटू कुमार कार्तिकेयने उल्लेखनीय कामगिरी केली.
कार्तिकेयने हॅट्ट्रीकसह ६ विकेट्स घेतल्या, मात्र त्याचा जागतिक विक्रमाची बरोबरी करण्याची किंवा तो मोडण्याची संधी थोडक्यात मुकली. एक विक्रम मात्र त्याने आपल्या नावे केला आहे. तो एकाच टी२० सामन्यात इतक्या विकेट्स घेणारा दुसराच भारतीय गोलंदाज ठरला आहे. एमपीएल २०२६ मध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या कार्तिकेयला आयपीएल २०२६ च्या लिलावामध्ये कोणीही खरेदी केले नव्हते.
कार्तिकेयने आयपीएल २०२६ च्या मेगा लिलावामध्ये आपली मूळ किंमत ३० लाख रुपये ठेवली होती, मात्र कोणत्याही फ्रॅंचायजीने त्यामध्ये रस दाखवला नाही. नंतर चेन्नई सुपर किंग्जने त्याला आपला नेट बॉलर केले. आता तो भोपाळ लेपर्ड्सविरुद्धच्या सामन्यात त्याने केवळ आपली क्षमताच सिद्ध केली नाही, तर आयपीएल फ्रॅंचायझींना सडेतोड उत्तर दिले आहे.
कार्तिकेयने ३ षटकांत २४ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. त्याने पवन निरवाणी, प्रांजुल पुरी आणि अनुराग मालविया यांना सलग बाद केले. त्याआधी त्याने अंश बगाडिया, हिमांशू शिंदे आणि तनिष्क यादव यांना बाद केले होते. टी२० च्या एका डावात इतके विकेट्स घेणारा तो दीपक चहरनंतरचा दुसरा भारतीय खेळाडू आहे. चहरने ही कामगिरी आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात केली होती. त्याने २०१९ मध्ये बांग्लादेशविरुद्ध ३.२ षटकांत ७ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या. ही भारतीय खेळाडूची टी२० मधील सर्वोत्तम कामगिरी आहे.
या सामन्यात कार्तिकेयने एक विकेट आणखी घेतली असती, तर त्याने दुसऱ्या क्रमांकाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली असती. टी२० च्या एका डावात सर्वाधिक सात विकेट्स घेण्याचा विक्रम मलेशियाच्या स्याझादुल इद्रुसच्या नावावर आहे. त्याने चीनविरुद्ध चार षटकांत ८ धावा देत ही कामगिरी केली होती.
टी२० क्रिकेटमध्ये एका सामन्यात ८ विकेट्स घेण्याची विक्रमी कामगिरी भूटानच्या सोनम येशे याच्या नावावर आहे. त्याने म्यानमारविरुद्ध केवळ ७ धावा देत ८ विकेट्स घेतल्या होत्या. एका टी२० सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या विक्रम त्याच्याच नावावर आहे. ही कामगिरी टी२० क्रिकेटच्या (आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत ) इतिहासातील एकमेव ८ विकेट्सची कामगिरी आहे.
कार्तिकेयच्या कामगिरीमुळे लेपर्ड्सला पुर्ण २० षटकेही खेळता आली नाहीत, ते १३ षटकांत १०७ धावसंख्येवरच गारद झाले. प्रत्युत्तरात ईगल्सने ९.२ षटकांत २ विकेट्स गमावत लक्ष्य गाठले. त्यामध्ये कनिष्क दुबेने १९ चेंडूंत नाबाद ५१ धावा केल्या. सामनावीर अर्थातच कार्तिकेय ठरला.
Comments are closed.