वृक्षतोडीवरुन दोन्ही शिवसेनेचं एकमत; शिंदेंची सेना तपोवनात, ठाकरेंच्या खासदाराचा दिल्लीत आवाज
नवी दिल्ली: यंदाच्या कुंभमेळ्यासाठी (Kumbhmela) नाशिकच्या तपोवन परिसरातील अंदाजे 1800 झाडांच्या कत्तलीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या संतापाची दखल आता थेट देशाच्या संसदेत घेतली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे (Nashik) खासदार राजाभाऊ वाजे यांनी आज लोकसभेत शून्य प्रहरात तपोवन झाडतोडीचा मुद्दा जोरदारपणे मांडला. याआधी त्यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना पत्र लिहून झाडतोड तात्काळ थांबवण्याची मागणी केली होती. तसेच, 3 डिसेंबर रोजी त्यांनी तपोवन परिसराला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यामुळे, कुंभमेळ्यासाठीच्या वृक्षतोडीला विरोध वाढत असल्याच दिसून येत आहे.
लोकसभेत बोलताना खासदार वाजे म्हणाले की तपोवन परिसर केवळ हिरवाईचा पट्टा नसून प्रभू श्रीरामांच्या वास्तव्याने पावन झालेला धार्मिक वारसा, जैवविविधतेचे केन्द्र आणि नाशिकचे फुफ्फुस आहे. “हिंदू धर्म निसर्गपूजनाची शिकवण देतो. अशा पवित्र भूमीत हजारो झाडे तोडणे म्हणजे श्रद्धा, पर्यावरण आणि सांस्कृतिक वारसा तिन्हीवर कुऱ्हाड”, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. तपोवनात अनेक पक्षी, प्राणी, व दुर्मिळ जैववैविध्य आढळत असून या परिसंस्थेचा विनाश नाशिककरांच्या भावनांना वेदना देणारा असल्याचे ते म्हणाले. खासदार वाजे यांच्या पुढाकाराने तपोवन प्रश्न राज्याबाहेर जाऊन देशाच्या सभागृहातही प्रतिध्वनीत झाला आहे. नाशिककरांचा संताप आणि आंदोलनाची उर्मी केंद्र सरकारने लक्षात घेतली पाहिजे, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. संसदेतल्या प्रभावी भाषणाने स्पष्ट संकेत मिळाले की तपोवन बचावासाठीचा लढा आता निर्णायक टप्प्यात आहे. नाशिककरांचा वैताग, जनभावना, धार्मिक महत्त्व आणि पर्यावरणीय धोका या सर्वांचा संगम असलेला हा मुद्दा आता सरकारकडून निर्णायक प्रतिसादाची वाट पाहत आहे.
“पर्यायी जागा असताना तपोवनच का?”
संसदेत मांडलेल्या भाषणात खासदार वाजे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. नाशिकमध्ये साधुग्रामासाठी अनेक पर्यायी जागा उपलब्ध असताना तपोवनच निवडण्यात का आले?
पर्यावरण परिणाम अहवाल, तज्ज्ञांचे मत, सार्वजनिक चर्चा या सर्वांना पूर्णपणे बायपास करून निर्णय रेटण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले. तपोवनचा नाश करून ‘हरित कुंभ’ कसा होणार?” असा प्रश्न त्यांनी उभा केला.
तपोवनाची पाहणी : “वन निघून गेल्यावर तपोवनात काय उरेल?”
3 डिसेंबर रोजी तपोवन भेटीदरम्यान खासदार वाजे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिक, तपोवन बचाव समिती व पर्यावरणतज्ज्ञांकडून माहिती घेतल्यानंतर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, “तपोवन या नावातच सर्व काही आहे. ‘वन’ नाहीसे झाले तर तपोवन फक्त सिमेंटचे जंगल उरेल. नाशिकचे फुफ्फुस कायमचे हरवेल.” एक्झिबिशन सेंटरसाठीही त्याच परिसरात निविदा निघाल्याने नाशिककरांचा संशय अधिकच वाढल्याचे त्यांनी सांगितले.
“गोदावरी प्रदूषणावर गती कुठे? झाडतोडीतच का उत्सुकता?”
तपोवन भेटीप्रसंगी झाडतोडीच्या मुद्द्यासोबतच वाजे यांनी गोदावरी प्रदूषणाचाही विषय उपस्थित केला. “झाड तोडण्यासाठी प्रशासन एवढे सज्ज असते पण गोदावरी प्रदूषण थांबवण्यासाठी जी गती हवी ती कुठे आहे?” असा त्यांनी सवाल केला. कुंभमेळ्यापूर्वी एसटीपी प्रकल्प पूर्ण होईल की नाही याची शंका त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
आणखी वाचा
Comments are closed.