एम्बाप्पे फ्रान्सचा नवा गोलसम्राट! सेनेगलवर 3-1 गोलफरकाने विजय
फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बाप्पे याने फुटबॉल वर्ल्ड कपमधील सेनेगलविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात दोन गोल झळकावत अनेक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केले. फ्रान्सने सेनेगलवर 3-1 गोलफरकाने विजय मिळवित स्पर्धेची विजयी सुरुवात केली. एम्बाप्पेने फ्रेंच फुटबॉल इतिहासात नवे पर्व सुरू केल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.
27 वर्षीय एम्बाप्पेने सामन्यातील दोन गोलांच्या जोरावर फ्रान्ससाठी एकूण 58 गोलांची नोंद केली आणि ऑलिव्हिए गिरूदचा 57 गोलांचा विक्रम मागे टाकत देशाचा सर्वकालीन अव्वल गोलस्कोरर बनला. विशेष म्हणजे, या सामन्याचे समालोचन करणाऱया गिरूद यांनीच एम्बाप्पेच्या विक्रमाचे थेट प्रक्षेपणादरम्यान अभिनंदन केले.
एम्बाप्पेने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावे केला. विश्वचषक स्पर्धेत त्याची गोलसंख्या 14 वर पोहोचली असून तो फ्रान्सचा सर्वाधिक विश्वचषक गोल करणारा खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम 1958 च्या विश्वचषकात 13 गोल करणाऱया जस्ट फॉन्टेनच्या नावावर होता. तसेच 14 विश्वचषक गोल करणारा तो सर्वात युवा खेळाडूदेखील ठरला.
विश्वचषकातील सर्वाधिक गोलांच्या यादीत एम्बाप्पे आता तिसऱया स्थानावर आहे. जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोजाच्या 16 गोलांच्या विक्रमापासून तो केवळ दोन गोल दूर आहे. ब्राझीलचा रोनाल्डो 15 गोलांसह दुसऱया क्रमांकावर आहे.
सामन्यात 66 व्या मिनिटाला मायकेल ओलिसेच्या अचूक पासवर एम्बाप्पेने पहिला गोल करत फ्रान्सचे खाते उघडले. पहिल्या सत्रात संघर्ष करणाऱया फ्रान्सने दुसऱया सत्रात जोरदार पुनरागमन केले. ब्रॅडली बारकोलाने दुसरा गोल केला, तर अतिरिक्त वेळेत सेनेगलच्या इब्राहिम म्बायेने एक गोल करत अंतर कमी केले. मात्र, अखेरच्या क्षणी एम्बाप्पेने लांबून झंझावाती फटका मारत चेंडू जाळ्यात धाडला आणि फ्रान्सचा विजय निश्चित केला.
Comments are closed.