गोल्डन बूट एम्बाप्पेच्या पायात? मेस्सीसमोर हॅटट्रिकचे आव्हान, मात्र गोल्डन बॉलवर मजबूत पकड

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कांस्यपदकाच्या लढतीत इंग्लंडविरुद्ध दोन गोल झळकावत किलियन एम्बाप्पेने ‘गोल्डन बूट’ जवळजवळ आपल्या पायात घातला आहे. या दोन गोलांसह त्याची यंदाच्या वर्ल्ड कपमधील गोलसंख्या 10 वर पोहोचली असून अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी आता त्याच्यापेक्षा दोन गोलांनी पिछाडीवर पडला आहे. त्यामुळे आज होणाऱया अंतिम सामन्यात मेस्सीसमोर केवळ स्पेनला हरवून वर्ल्ड कप जिंकण्याचेच नव्हे, तर हॅटट्रिक करून ‘गोल्डन बूट’ हिसकावून आणण्याचेही अशक्यप्राय आव्हान उभे ठाकले आहे.

फायनलमध्ये स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात ट्रॉफीसाठी महासंग्राम रंगणार असला तरी मैदानावर आणखी एक अदृश्य लढतही पाहायला मिळणार आहे. ती म्हणजे ‘गोल्डन बूट’ आणि ‘गोल्डन बॉल’ या दोन सर्वोच्च वैयक्तिक पुरस्कारांची. एका बाजूला अर्जेंटिनाचा फुटबॉलचा जादूगार मेस्सी, तर दुसऱया बाजूला फ्रान्सचा गोलमशीन एम्बाप्पे. ट्रॉफी एका संघाला मिळणार असली तरी या वैयक्तिक पुरस्कारांसाठी अनेक दिग्गजांचे भविष्य फायनलमध्ये ठरणार आहे.

तिसऱया स्थानाच्या सामन्यात एम्बाप्पेने दोन गोल झळकावत आपली गोलसंख्या 10 वर नेली. त्यामुळे त्याने ‘गोल्डन बूट’च्या शर्यतीत मेस्सीवर दोन गोलांची आघाडी घेतली आहे. आता मेस्सीने फायनलमध्ये किमान दोन गोल केले तर तो एम्बाप्पेची बरोबरी करेल. मात्र ‘गोल्डन बूट’ निर्विवाद जिंकायचा असेल तर त्याला तीन गोल झळकवत हॅटट्रिक साकारावी लागेल. फायनलसारख्या प्रचंड दडपणाच्या सामन्यात हॅटट्रिक करणे म्हणजे एव्हरेस्ट सर करण्याइतके कठीण मानले जाते. मात्र मेस्सीच्या जादुई डाव्या पायाकडून अशक्यही शक्य होऊ शकते, अशीच अर्जेंटिनाच्या चाहत्यांची आशा आहे.

एम्बाप्पेने यंदा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम केला आहे. 1970 मध्ये जर्मनीच्या गर्ड म्युलरनंतर एका वर्ल्ड कपमध्ये दहा गोल करणारा तो पहिलाच फुटबॉलपटू ठरला आहे. 2022 मध्ये ‘गोल्डन बूट’ जिंकणाऱ्या या फ्रेंच सुपरस्टारने सलग दुसऱयांदा हा किताब जिंकण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. त्यामुळे आता मेस्सीनेच चमत्कार घडवला, तरच ‘गोल्डन बूट’ अर्जेंटिनाच्या छावणीत जाणार आहे.

मात्र ‘गोल्डन बूट’ जरी हातातून निसटण्याची शक्यता असली तरी ‘गोल्डन बॉल’वर मेस्सीची पकड सर्वाधिक मजबूत मानली जात आहे. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार मेस्सी यापूर्वी दोनदा जिंकणारा एकमेव फुटबॉलपटू आहे. यंदाही अर्जेंटिनाला सलग दुसऱया वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचवण्यात त्याने सिंहाचा वाटा उचलला आहे. अर्जेंटिनाने ट्रॉफी जिंकली, तर ‘गोल्डन बॉल’ही त्याच्याच गळय़ात पडण्याची शक्यता प्रबळ मानली जात आहे. त्याचे प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांनीही ‘तो महान खेळाडू आहे,’ अशा शब्दांत त्याच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.

फायनलनंतर फिफाकडून इतर वैयक्तिक पुरस्कारांचीही घोषणा केली जाणार आहे. स्पर्धेतील सर्वोत्तम गोलरक्षकाला दिला जाणारा ‘गोल्डन ग्लोव्हज’ पुरस्कार जिंकण्यासाठी स्पेनचा उनाय सिमोन आघाडीवर आहे. सात सामन्यांत त्याने अवघा एकच गोल स्वीकारत स्पॅनिश बचावफळीचा अभेद्य किल्ला उभारला आहे. तर 21 वर्षांखालील सर्वोत्तम खेळाडूला दिल्या जाणाऱया ‘बेस्ट यंग प्लेअर’ पुरस्कारासाठी स्पेनचा 19 वर्षीय लामिन यमाल सर्वात मोठा दावेदार ठरला आहे. आपल्या धडाकेबाज कामगिरीने त्याने संपूर्ण फुटबॉलविश्वाला अक्षरशः भुरळ घातली आहे.

Comments are closed.