भाजपसमोर वाकणार नाही, झुकणार नाही – आदित्य ठाकरे
भाजप सरकारच्या काळात शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा झालाय. ‘नीट’ पेपरफुटीमुळे 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. हे भाजपचे देशाला अशिक्षित ठेवण्यासाठी, शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठीचे कारस्थान आहे. मात्र आम्ही भाजपचे अंधभक्त होणार नाही. अंधभक्त झालो तर छत्रपती शिवरायांचे, शाहू, फुले आणि संविधान देणाऱया ‘भारतरत्न’ डॉ. आंबेडकरांचे होऊ, असा आवाज देत ‘भाजपसमोर आम्ही वाकणार नाही, झुकणार नाही’ असा इशारा आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिला.
भाजपला 2014 मध्ये लोकांनी देश बदलण्यासाठी मतं दिली, मात्र आता ते संविधानच बदलायला निघालेत, त्यांना रोखायलाच हवे असे आवाहनही त्यांनी केले. इतर देशातील शास्त्रज्ञ संशोधनासाठी दुसऱया देशात जात असताना हे दुसऱया पक्षांचे खासदार पह्डायला निघालेत, असा टोलाही त्यांनी हाणला. आपल्या ‘इस्रो’तील 100 शास्त्रज्ञांनी राजीनामा दिला हे सरकारचे अपयशच असल्याचे ते म्हणाले. पण आता युवा रस्त्यावर उतरलाय. आपल्याला देशाच्या भविष्यासाठी एकत्र यावेच लागेल, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी ‘भारतमाता की जय’चा एकच नारा घुमला. दिल्लीत जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलक तरुणांचा आपल्याला अभिमान असल्याचे सांगतानाच आता महाराष्ट्रात ठिणगी पेटलीय. आम्ही दिल्लीतही आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. ‘नीट’ पेपरफुटीनंतर 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. मात्र पंतप्रधान धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला तयार नाहीत. असे काय चिकटलंय त्यांना? धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावाच लागेल. ‘मंत्री प्रधान’चे उलटे केले तर काय होते? ‘त्यांचा’ राजीनामा मागायलाही आम्ही कमी करणार नाही!
अदानी सर्वांचा धनी!
सरकारने 2022 मध्ये वचन दिले होते… ‘हर घर नल’, ‘स्मार्ट सिटी’, ‘प्रत्येकाला घर’… मिळालेय का कुणाला? असा सवालही त्यांनी केला. मंत्री ‘रील मंत्री झालेत’, इकॉनॉमी ढासळलीय. ‘सबका मालिक एक’ साईबाबांसाठी होते, मात्र आता ‘सबका मालिक अदानी’ असेच सरकारचे धोरण असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. सगळ्या महामार्गांची दुरवस्था झाली असताना इथेनॉलचे प्रयोग केले जात आहेत. यांना रस्ते बनवता येत नाहीत. कारण यांचे टार्गेट ‘मिसिंग लिंक’ आहे. खरेतर सरकारचे ‘इंटेट’ मिसिंग झालेय, असेही ते म्हणाले.
Comments are closed.