वादळी पावसातही एम्बाप्पेची वीज कडाडली! फ्रान्सचा इराकवर दणदणीत विजय
आकाशात विजांचा कडकडाट, मैदानावर खेळाचा खंड आणि तब्बल दोन तासांचा विलंब… पण या सर्व गोंधळातही किलियन एम्बाप्पेची चमक कायम राहिली. त्याच्या दोन गोलांच्या जोरावर फ्रान्सने इराकचा 3-0 असा सहज पराभव करत फिफा वर्ल्ड कपमध्ये बाद फेरीच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले.
सामन्याच्या पहिल्याच टप्प्यात फ्रान्सने आक्रमक खेळ करत इराकवर दबाव निर्माण केला. 14 व्या मिनिटाला मायकेल ओलिसेच्या पासवर एम्बाप्पेने पेनल्टी क्षेत्राबाहेरून जोरदार फटका मारत चेंडू जाळ्यात धाडला आणि फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. यानंतर वादळी हवामानामुळे खेळाला मोठा खंड पडला. मध्यंतरानंतर सुरू होणारा दुसरा हाफ तब्बल दोन तास उशिराने सुरू झाला. विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे प्रेक्षकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. मैदानावर साचलेले पाणी काढण्यासाठी कर्मचाऱयांना विशेष मेहनत घ्यावी लागली, मात्र खेळ पुन्हा सुरू होताच इराककडून झालेल्या मोठय़ा चुकीचा फ्रान्सने पुरेपूर फायदा घेतला.
गोलकिकवरील गोंधळानंतर उस्मान डेम्बेलेने चेंडू एम्बाप्पेकडे सोपवला आणि त्याने सहज गोल करत संघाची आघाडी दुप्पट केली. यानंतर 12 मिनिटांनी डेम्बेलेनेही आपली छाप उमटवली. मायकेल ओलिसेच्या अचूक पासवर त्याने नियंत्रण राखत गोलरक्षक अहमद बासिलला चकवत तिसरा गोल नोंदवला आणि फ्रान्सचा विजय जवळपास निश्चित केला.
या सामन्यातील दोन गोलांसह एम्बाप्पेने विश्वचषकातील आपल्या कारकीर्दीतील गोलसंख्या 16 वर नेली. त्यामुळे त्याने जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोझे याच्या विक्रमाशी बरोबरी साधली, मात्र याच दिवशी अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीने ऑस्ट्रियाविरुद्ध दोन गोल झळकावत 18 गोलांचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केल्याने एम्बाप्पेला अजूनही त्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
फ्रान्सने सलग दुसरा विजय मिळवत सहा गुणांची कमाई केली असून 32 संघांच्या बाद फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. दुसरीकडे इराकचे आव्हान अद्याप संपलेले नसले तरी पुढील फेरी गाठण्यासाठी त्यांना शेवटच्या सामन्यात विजयासह इतर निकालांवरही अवलंबून राहावे लागणार आहे.
Comments are closed.