बोगस लाडक्या बहिणींना तब्बल 9 हजार 605 कोटी रुपयांचे वाटप! पीएम केअर फंडापेक्षा मोठ्या रकमेचा घोटाळा

महायुती सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे शासकीय तिजोरीची लयलूट सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेत तब्बल 9605 कोटी रुपयांचे वाटप बोगस लाभार्थींना करण्यात आले आहे. अपात्र लाडक्या बहिणींवर पीएम केअर्स फंडातील शिल्लक निधीपेक्षाही मोठय़ा रकमेचा घोटाळा करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून शासकीय तिजोरीवर आर्थिक ताण येत आहे. या योजनेसाठी वेळप्रसंगी इतर विभागातील योजनांचा निधी वळवला जात आहे. लाडक्या बहीण योजनेतील बोगस लाभार्थींना वगळण्यासाठी गेल्या दोन वर्षांत अनेकवेळा याद्यात सुधारणा करण्यात आली. त्यानंतरही जून 2026 पर्यंत 92 लाख अपात्र लाडक्या बहिणींवर 9,605 कोटी रुपये खर्च करून सरकारी तिजोरीची लूट करण्यात आल्याचे वास्तव माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे.

दोषींवर कारवाई करा – जयंत पाटील

गरजू महिलांना मदत मिळायलाच हवी; पण जनतेच्या पैशांचा असा निष्काळजीपणे वापर समर्थनीय नाही. सरकारने या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून प्रत्येक स्तरावरील दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. योजना लागू करण्यापूर्वी छाननी का झाली नाही? अपात्र लाभार्थ्यांना सरसकट हप्ते का दिले गेले? हजारो कोटींच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? लाडकी बहिणींच्या नावाखाली पैशाचा अपहार झाला का? असा प्रश्न पाटील यांनी केला आहे.

राज्यात सध्या एक कोटी 65 लाख महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत.

नोव्हेंबर 2025 पर्यंत 2 कोटी 1 लाख लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता.

फेब्रुवारी आणि मे 2025 मध्ये सर्वाधिक 2 कोटी 4 लाख लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता.

राज्य सरकारने या योजनेवर 24 महिन्यांत 76,231 कोटी रुपये खर्च केले आहेत.

अपात्र लाभार्थ्यांमुळे मासिक 5,450 कोटी रुपये वितरित होण्याऐवजी 3,640 कोटींहून अधिकचा निधी वितरित झाला आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 4 लाख 50 हजार सरकारी कर्मचाऱ्यांनाही योजनेतून वगळले आहे. तसेच जिल्हा स्तरावर पडताळणी केल्यानंतर 1 लाख 70 हजार लाभार्थ्यांना वगळले गेले.

अपात्र लाभार्थी किती?

ई-केवायसी पूर्ण नाही ः 62 लाख, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त ः 16 लाख, संजय गांधी निराधार लाभार्थी ः 3 लाख 60 हजार, एकाच कुटुंबात दोनपेक्षा अधिक लाभार्थी ः 2 लाख 50 हजार, 65 वर्षांपेक्षा जास्त वय ः 1 लाख 80 हजार

Comments are closed.