खवडय़ा डोंगरावरील घटना कौटुंबिक वादातून, एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कौटुंबिक वादातून आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या मुलाला वाचविताना खवडय़ा डोंगरावरून पडून मुलासह वडिलांचा मृत्यू झाला. डोळय़ादेखत मुलासह पती दरीत कोसळल्याचे पाहून आईने दरीत उडी घेतल्याने अख्ख्या कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेमुळे राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून हा प्रकार कौटुंबिक वादातून घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

झाल्टा फाटय़ावरील अक्षयबन सोसायटीत राहणारे मुरलीधर दामोधर चांदगुडे (48, मूळगाव धनगर पिंपळगाव, ता. अंबड) हे पत्नी संगीता (42) आणि मुलगा कुणाल (19) सोबत राहत होते. त्यांचा मुलगा  कुणाल याचा आई-वडिलांसोबत कौटुंबिक वाद झाल्याने तो सकाळी आठ वाजता रागाच्या भरात घरातून निघून गेला होता. त्याचा शोध घेत मुरलीधर आणि संगीता हे दोघे तीसगाव शिवारातील खवडय़ा डोंगरावर पोहोचले. कुणाल हा डोंगराच्या काठावर बसलेला होता. आई-वडिलांसह परिसरातील नागरिकांनी त्याची समजूत काढली. मात्र, ऐकत नसलेल्या मुलाला आत्महत्यापासून रोखण्यासाठी गेलेल्या वडिलांसह दोघांचा तोल गेला. त्यामुळे दोघेही दरीत कोसळून त्यांचा मृत्यू झाला. पोटचा गोळय़ासह पती दरीत कोसळल्याने त्यापाठोपाठ आईनेही उडी मारल्याचे पाहून सारेच थिजून गेले. खाली कपारीत कोसळल्यामुळे तिघांचाही जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलिसांकडून चांदगुडे यांच्या घराची तपासणी

चांदगुडे कुटुंबाची आत्महत्या ही एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेश ठाकरे करीत आहे. त्यांनी आज चांदगुडे यांच्या निवासस्थानची पाहणी केली. याप्रकरणी उद्या नातेवाईकांचा जबाब नोंदविला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Comments are closed.