शेतकरी-शेतमजुरांच्या आत्महत्येच्या घटना घडत असताना सत्ताधाऱ्यांना झोप तरी कशी लागते? रोहित पवार यांचा सवाल

नांदेड येथील शेतकऱ्याच्या आत्महत्येची दुर्दैवी घटना ताजी असतानाच आता लातूरमध्ये मायक्रो फायनान्सच्या वसुलीला आणि कर्जाला कंटाळून एका 29 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. या वाढत्या घटनांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. सातत्याने शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्येच्या घटना घडत असताना सत्ताधाऱ्यांना झोप तरी कशी लागते? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

या प्रकरणी रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले की, नांदेडची घटना ताजी असतानाच लातूरमधील युवकाच्या आत्महत्येने पुन्हा एकदा व्यवस्थेचे टोकदार वास्तव समोर आणले आहे. संपूर्ण राज्यातील शेतकरी आज दुष्काळामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. परंतु या बिकट परिस्थितीतही सरकारने अद्याप मदतीचा एक रुपयाही दिलेला नाही. खरीपाचे पीक पूर्णपणे हातातून गेले असून, रब्बीची कोणतीही आशा उरलेली नाही. जनावरांना चारा नसल्याने त्यांना बाजारात विकण्याची किंवा दाखवण्याची वेळ बळीराजावर आली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असताना सरकार मात्र सत्तेच्या नशेत मश्गूल असल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करत रोहित पवार यांनी सरकारला काही महत्त्वाचे इशारे दिले आहेत. सरकारने तातडीने पावले उचलत राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांपर्यंत तातडीची मदत द्यावी आणि शेतमजुरांना 25 हजार रुपयांचे अर्थसहाय्य करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, संपूर्ण राज्यभरात मायक्रो फायनान्स कंपन्या, खासगी सावकार आणि खासगी बँका यांच्याकडून सर्वसामान्यांवर आणि शेतकऱ्यांवर केली जात असलेल्या बळजबरीच्या कर्जवसुलीला तात्काळ स्थगिती देण्याचे निर्देश सरकारने द्यावेत. त्याचबरोबर सरसकट कर्जमाफी किंवा व्याजसूट याबाबत तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी आक्रमक मागणीही रोहित पवार यांनी यावेळी केली आहे.

Comments are closed.