Latur News – औराद शहाजानीमध्ये उष्माघाताचा पहिला बळी; शेतकर्याचा दुर्दैवी मृत्यू
निलंगा तालुक्यात सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून औराद शहाजानी येथे उष्माघाताने एका शेतकर्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. लक्ष्मण दादाराव भंडारे (वय ६०) असे या मृत शेतकर्याचे नाव आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पार गेल्याने अंगाची लाहीलाही होत होती. शेतात काम करताना ही दुर्दैवी घटना घडली.
निलंगा तालुक्यासह औराद शहाजनी परिसरात एप्रिलच्या सुरुवातीपासूनच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास कमाल तापमान ४२.८ अंशांपर्यंत पोहोचले होते. तर किमान तापमान ३१.५ अंश नोंदवण्यात आले. याच रणरणत्या उन्हात लक्ष्मण भंडारे हे दुपारी चारच्या सुमारास आपल्या शेतात काम करत होते. काम करत असतानाच अचानक त्यांना चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले.
भंडारे यांना तातडीने औराद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी निलंगा येथे हलवण्याचा सल्ला दिला. निलंग्याला नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, पाच मुली, सून आणि नातू असा परिवार आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते दिवसभर कडक उन्हात शेतात काम करत होते. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी अचानक कमी झाली (डिहायड्रेशन). परिणामी, त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. हा उष्माघाताचाच प्रकार असून उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
Comments are closed.