4 सप्टेंबर रोजी GISAT-1A चे प्रक्षेपण
पीएसएलव्ही-सी62 च्या अपयशानंतर इस्रोचे मोठे पुनरागमन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या ‘जीआयसॅट-1ए’ (ईओएस-05) आणि एनव्हीएस-03 उपग्रहांच्या प्रक्षेपणाला मंजुरी दिली आहे. आता इस्रो 4 सप्टेंबरच्या सकाळी ‘जीआयसॅट-1ए’ उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. दोन्ही उपग्रह श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रावर अनेक आठवड्यांपासून प्रक्षेपणाच्या मंजुरीची वाट पाहत होते. या प्रक्षेपणाच्या माध्यमातून 12 जानेवारी रोजी पीएसएलव्ही-सी62 मोहीम अयशस्वी झाल्यापासून इस्रो पहिल्यांदाच प्रक्षेपण स्थळावर परतण्याची तयारी करत आहे.
इस्रो 4 सप्टेंबरच्या सकाळी ‘जीआयसॅट-1ए’ म्हणजेच ईओएस-05 उपग्रह प्रक्षेपित करण्याची तयारी करत आहे. मूळ ‘जीआयसॅट-1’ मोहिमेप्रमाणेच ‘जीआयसॅट-1ए’ची रचना मोठ्या आणि महत्त्वपूर्ण क्षेत्रांची रियल टाईम छायाचित्रे वारंवार पुरवण्यासाठी करण्यात आली आहे. सुमारे 2.2 टन वजनाचा ‘जीआयसॅट-1ए’ हा उपग्रह पृथ्वी निरीक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. तो मोठ्या क्षेत्रांची सतत आणि अचूक छायाचित्रे पुरवेल. यामुळे कृषी, खनिजे, आपत्ती व्यवस्थापन, ढग, बर्फ, हिमनदी आणि समुद्रशास्त्र यांसारख्या क्षेत्रांमध्ये मदत होईल. हा उपग्रह प्रामुख्याने नागरी वापरासाठी तयार केला असला तरी, त्याची सतत देखरेख करण्याची क्षमता सुरक्षा आणि लष्करी कारवायांचे नियोजन करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. इस्रोच्या एका शास्त्रज्ञाच्या मते, हा केवळ जुन्या ‘जीआयसॅट-1’चा पर्याय नसून त्यात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत.
मजबूत स्वदेशी GPS प्रणाली
दरम्यान, एनव्हीएस-03 भारताची स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली ‘एनएव्हीआयसी’ अधिक मजबूत करेल. भारताच्या जीपीएस पर्यायाला अधिक सक्षम बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जाते. भारताच्या ‘जीआयसॅट-1’ कार्यक्रमाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे. आता आगामी मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारताच्या प्रक्षेपण कार्यक्रमाला मोठे बळ मिळणार आहे.
Comments are closed.