'श्रेयस' या अत्याधुनिक गस्ती जहाजाचे लोकार्पण
चाचेगिरी-घुसखोरी रोखण्यास मदत : भारतीय नौदलाची ताकद वाढणार
वृत्तसंस्था/ कोलकाता
भारतीय नौदलाची सागरी निगराणी आणि सुरक्षा क्षमता मजबूत करण्यासाठी कोलकातास्थित गार्डनरिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सने (जीआरएसई) शनिवारी ‘श्रेयस’ या अत्याधुनिक सागरी गस्ती नौकेचे (एनजीओपीव्ही) जलावतरण केले. भारतीय नौदलाचे उपप्रमुख व्हाईस अॅडमिरल अजय कोचर हे कोलकाता येथील ‘जीआरएसई’च्या राजाबागान डॉकयार्डमध्ये आयोजित या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या पत्नी, रेमन कोचर यांच्या उपस्थितीत युद्धनौकेचा पारंपरिक जलावतरण आणि नामकरण सोहळा पार पाडला.
‘जीआरएसई’ने भारतीय नौदलासाठी बांधलेल्या चार जहाजांच्या मालिकेतील ‘श्रेयस’ हे तिसरे जहाज आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या ‘जीआरएसई’ने, या मालिकेतील तीन जहाजे पाच महिन्यांपेक्षा कमी विक्रमी वेळेत जलावतरण करून प्रकल्पाचा वेग दाखवून दिला आहे. शनिवारी झालेल्या जलावतरण कार्यक्रमप्रसंगी जीआरएसई आणि भारतीय नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जलावतरणानंतर, जहाजाच्या विविध सागरी चाचण्या घेतल्या जातील. हे जहाज अत्याधुनिक सेन्सर्स आणि इतर उपकरणांनी सुसज्ज आहे. चाचणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ते नौदलाकडे सुपूर्द केले जाणार आहे.
113 मीटर लांबी, 3,000 टन वजन
‘श्रेयस’ ही गस्ती युद्धनौका अंदाजे 113 मीटर लांब आणि 14.6 मीटर रुंद आहे. त्याचे वजन अंदाजे 3,000 टन असून ते 23 नॉट्सच्या कमाल वेगाने प्रवास करू शकते. 14 नॉट्सच्या क्रूझिंग वेगाने त्याची कार्यक्षम श्रेणी 8,500 नॉटिकल मैलांपर्यंत असणार आहे. ते चाचेगिरीविरोधी कारवाया, घुसखोरीविरोधी कारवाया, मानवतावादी मदत, आपत्ती निवारण, शोध व बचावकार्य आणि आवश्यकतेनुसार रुग्णालयीन सेवांमध्येही सहभागी होतील.
ताकद अन् क्षमता अधिक भक्कम
ही नवीन जहाजे पूर्वी बांधलेल्या ऑफशोर पेट्रोल जहाजांपेक्षा मोठी आणि अधिक सक्षम आहेत. त्यांची ताकद, मारक क्षमता आणि विविध मोहिमा पार पाडण्याची क्षमता सुधारित आहे. या युद्धजहाजांचा उपयोग किनारी आणि सागरी मालमत्तेचे संरक्षण, सागरी निगराणी, संशयास्पद जहाजांना अडवणे व त्यांचा शोध घेणे, सागरी सुरुंग शोध मोहीम आणि विशेष मोहिमांसाठी केला जाईल.
ही नवीन पिढीची जहाजे आकार, दीर्घकालीन सागरी कारवाया, विस्थापन, आणि उपकरणे व शस्त्रs या बाबतीत पूर्वीच्या ऑफशोर पेट्रोल जहाजांपेक्षा अधिक प्रगत असल्याचे जीआरएसईचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) कमोडोर पी. आर. हरी यांनी सांगितले. या मालिकेतील पहिले जहाज ‘संघमित्र’, हे 20 मे 2026 रोजी आणि दुसरे ‘श्रुती’ हे 11 ऑगस्ट 2026 रोजी जलावतरण करण्यात आले होते. आता ‘श्रेयस’च्या जलावतरणाने जीआरएसईने भारतीय नौदलाच्या 11 जहाजांच्या एनजीओपीव्ही कार्यक्रमांतर्गत आपल्या चार जहाजांच्या प्रकल्पात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
Comments are closed.