'सिलिगुडी कॉरिडॉर' प्रकल्प प्रगतीपथावर आहे

भारतीय लष्कर 18 ऐवजी 3 तासांत सिलीगुडीला पोहोचणार

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

सिलीगुडी कॉरिडॉर पुढील चार वर्षांत देशातील सर्वात सुरक्षित लष्करी मार्ग बनणार आहे. जून 2017 मधील डोकलाम संघर्षानंतर केंद्र सरकारने चिकन नेक (सिलीगुडी कॉरिडॉर) आणि सिक्कीम प्रदेशात अंदाजे चार मोठे सुरक्षा आणि पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू केले. सध्या, अवघड डोंगराळ प्रदेश आणि एकेरी वाहतूक मार्गांमुळे अवजड तोफखाना आणि सैन्य सीमेपर्यंत पोहोचवण्यासाठी 12 ते 18 तास लागतात. आता हे प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण झाल्यानंतर हा वेळ केवळ 3 तासांपर्यंत कमी होईल, असा दावा केला जात आहे. या प्रकल्पामुळे भारतीय लष्कराला कोणत्याही चिनी आव्हानाला प्रभावीपणे प्रत्युत्तर देणे शक्य होईल. या सामरिक तटबंदीचा उद्देश ईशान्य भारतातील 4 कोटी लोकांचा उर्वरित भारताशी संपर्क कायम ठेवणे हा आहे.

या प्रकल्पांचे मुख्य आकर्षण म्हणजे 36 किलोमीटर लांबीचा रेल्वे बोगदा  जमिनीखाली 20 मीटर खोलीवर बांधला जाणार आहे. नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेच्या मसुद्यानुसार, हा बोगदा पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर जिह्यातील तीन मैल हाटपासून सिलिगुडीजवळील रंगपाणीपर्यंत बांधला जाईल. भारत, नेपाळ आणि बांगलादेशच्या सीमेला लागून बांधल्या जाणाऱ्या या बोगद्यातून रेल्वेगाड्या जाऊ शकतील. युद्धाच्या काळात तोफखाना आणि अत्यावश्यक सामग्री कोणत्याही अडथळ्याशिवाय आघाडीच्या चौक्यांपर्यंत पोहोचवता येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पश्चिम बंगालमध्ये स्थित असलेला ‘चिकन नेक’ परिसर सिलीगुडी कॉरिडॉर म्हणून ओळखला जाणार आहे. केवळ 22 किलोमीटर रुंदीचा हा अरुंद भूमार्ग ईशान्य भारताला देशाच्या उर्वरित भागाशी जोडतो. या मार्गाच्या दक्षिणेला बांगलादेश, ईशान्येला चीनचे चुंबी खोरे, पश्चिमेला नेपाळ आणि उत्तरेला भूतान या देशांच्या सीमा आहेत. त्याच्या अरुंद रुंदीमुळे आणि आंतरराष्ट्रीय सीमांच्या सान्निध्यामुळे हा परिसर भारतासाठी एक अत्यंत संवेदनशील भाग मानला जातो.

Comments are closed.