‘हे सरकार जरांगे समोर लाचार झालंय, कालचा निर्णय असंवैधानिक’; लक्ष्मण हाकेंचा फडणवीस सरकारवर थेट

लक्ष्मण हाके : मराठा समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी राज्य सरकारनं (State Government) एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता इतर मागासवर्गीय (OBC) समाजाप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधा लागू करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. याशिवाय, मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याचा निर्णयही मंजूर करण्यात आला आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस सरकारवर कडाडून टीका केली आहे.

लक्ष्मण हाके म्हणाले की, काल राज्य सरकारने काही निर्णय घेतले आहेत, त्यावरच बरीच चर्चा सुरू आहे. ज्या योजना ओबीसींसाठी, त्याच योजना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी देण्याचा निर्णय झाला आहे. ज्या योजना ओबीसी समाजाला दिल्या आहेत, त्या अभ्यासपूर्ण आहेत. याच योजना मराठा समाजासाठी जाहीर करत आहेत, त्यामागचे लॉजिक आम्हाला कळले नाही. मराठा समाज त्या नियमांत बसतो का? ही तर शासनाची वैचारिक दिवाळखोरी आहे, अशी टीका त्यांनी केलीय.

Laxman Hake: कालचा निर्णय असंवैधानिक

लक्ष्मण हाके पुढे म्हणाले की, सर्व निकष बाजूला ठेवले आहेत का? अनेक महामंडळांना अपुरा निधी असताना, मराठा समाजाला एवढा निधी का दिला जात आहे? ओबीसी लोकांना सरकारने आतापर्यंत काय दिले आहे, त्याची श्वेतपत्रिका जाहीर करावी. अनेक प्रश्न सरकारवर उपस्थित होत आहेत. मागासवर्गीय लोकांना माणुसकी म्हणून पुढे येण्यासाठी सरकार काही योजना देणार आहे का? सरकार मूलभूत तत्त्वांना हरताळ फासत आहे. कालचा निर्णय असंवैधानिक आहे.

Laxman Hake: हे सरकार जरांगे समोर लाचार झालंय

मराठा समाजाला ओबीसींच्या योजना दिल्या, मग राज्यात आता राहिले कोण आहे? मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना काही वेगळे मिळत असेल तर आमचा विरोध नाही, मात्र हे देताना काय निकष लावले आहेत? कुठल्या तत्त्वावर तुम्ही हे दिले, कुठल्या समितीची शिफारस यासाठी होती? हे सरकार झुंडशाहीला बळी पडले आहे, हे सरकार मनोज जरांगे (Manoj Jarange) समोर लाचार झाले आहे, असा घणाघात त्यांनी यावेळी केला.

Laxman Hake: सरकारने मराठा समाजाची देखील फसवणूक केलीय

ओबीसी संदर्भात सरकारने उघडपणे दुजाभाव केला आहे. कोणीतरी आंदोलनाला बसले म्हणून तुम्ही भीक घालता? ओबीसी समाजात आता या निर्णयामुळे प्रचंड नाराजी आहे. ओबीसींच्या मनात सरकारच्या या धोरणांबद्दल प्रचंड चीड आहे. आम्ही कशाप्रकारे आमचा रोष दाखवून देऊ, हे येणाऱ्या काळात सरकारला कळेच. शासन आम्हाला बेदखल करत आहे. सरकारने मराठा समाजाची देखील फसवणूक केली आहे. मराठा समाजाला काय दिले, काय नाही हे सोडा; पण ओबीसी समाजाला तुम्ही आतापर्यंत काय दिले हे आधी सांगा. नेत्यांनी आपापली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी देखील लक्ष्मण हाके यांनी केली.

Laxman Hake: तर तुम्ही स्वतःला ओबीसी म्हणून घेणे बंद करा

लक्ष्मण हाके पुढे म्हणाले की, आम्ही देखील अनेकदा विचारतो की तुम्ही ओबीसी नेते असून का बोलत नाही? ओबीसी संदर्भात प्रश्न विचारायला महाराष्ट्राचा एकही मोठा नेता समोर येत नाही, हे मोठे दुर्दैव आहे. मराठा समाज नेमके कोणते निकष पूर्ण करत आहे? यात लॉजिक नेमके काय आहे? ज्यांनी काल निर्णय घेतला त्यांनी याचे उत्तर द्यावे. जो निर्णय काल शासनाने घेतला आहे, त्याच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाऊ. राज्यातल्या ओबीसी नेत्यांनी आवाज उठवून सरकारला ‘सळो की पळो’ करायला हवे. ओबीसींचे आरक्षण संपत असताना कोणीही बोलायला तयार नाही. चंद्रशेखर बावनकुळे, भुजबळ साहेब, गणेश नाईक, पंकजा मुंडे, संजय राठोड, गुलाबराव पाटील… ओबीसींबद्दल तुम्ही बोलणार आहात का नाही हे तुम्ही सांगा. तुम्ही बोलणार नसेल, तर तुम्ही स्वतःला ओबीसी म्हणून घेणे बंद करा, असे आव्हान त्यांनी ओबीसी नेत्यांना दिले.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

मराठा समाजासंदर्भात सुरु केलेल्या योजना बंद होऊ देऊ नका, जरांगे पाटलांची विनंती, मुख्यमंत्री उपमुख्यमत्र्यांसह विखे पाटलांचे मानले आभार

Comments are closed.