Lungi Ngidi injury update – सीटी स्कॅनचे रिपोर्ट आले; लुंगी एनगिडीच्या प्रकृतीबाबत सर्वात मोठी अपडेट
इंडियन प्रीमियर लीगमध्ये शनिवारी डबल धमाका पाहायला मिळाला. पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स संघात , तर दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबात संघात रंगला. दोन्ही लढतींमध्ये अक्षरश: धावांचा पाऊस पडला. मात्र दिल्ली विरुद्ध पंजाब लढतीत वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी याला गंभीर दुखापत झाली.
पंजाबचा खेळाडू प्रियांश आर्य याचा कॅच घेण्याच्या प्रयत्नात लुंगी एनगिडी याचा तोल गेला आणि डोके जमिनीवर आदळले. यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला कोणतीही हालचाल करता येत नव्हती. अखेर थेट मैदानात रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि तिथून त्याला रुग्णालयात नेण्यात आले. यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. आता त्याच्या तब्येतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
लुंगी एनगिडी याच्या डोक्याचा आणि मानेचा सीटी स्कॅन करण्यात आला असून त्याचे रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. सुदैवाने त्याच्या मेंदूला किंवा मणक्याला कोणतीही गंभीर इजा झालेली नाही. काही काळ त्याला तज्ज्ञ न्यूरोसर्जनच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. त्याच्या सर्व शारीरिक हालचाली आणि इतर गोष्टीही सामान्य असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा त्याला रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला.
दरम्यान, लुंगी एनगिडी दिल्ली कॅपिटल्सच्या टीम हॉटेलमध्ये परतला असून त्याला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. सध्या त्याला दिल्ली फ्रेंचायझीचे वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तो पुढील एक ते दोन सामने खेळण्याची शक्यता कमी आहे. पंजाबविरुद्धच्या लढतीत लुंगीच्या जागी विप्रज निगम याला कन्कशन सबस्टिट्यूट घेण्यात आले होते. तसेच आगामी लढतीपूर्वी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कही कमबॅक करण्याची शक्यता आहे.
Comments are closed.