बागेश्वर बाबा भाजपचे प्रचारक, त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विचार तोकडा करण्याचा प्रयत्न सुरू- संजय राऊत
भोंदूबाबांचे नवनवे कारनामे आणि नेत्यांच्या वादग्रस्त विधानांनी महाराष्ट्र ढवळून निघाला असताना आता ‘नवे इतिहासतज्ञ’ बागेश्वर बाबांनी थेट शिवरायांचा इतिहासच बदलून टाकला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज लढून थकले होते. त्यामुळे त्यांनी समर्थ रामदासांकडे जाऊन आपण राज्य कारभार सांभाळावा!’ अशी प्रार्थना केल्याचे बागेश्वर बाबा म्हणाले. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी बागेश्वर बाबासह भाजपर हल्लाबोल केला. बागेश्वर भाजपचे प्रचारक असल्याचे ते म्हणाले.
संजय राऊत यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधत ते म्हणाले की, बागेश्वर फागेश्वर हे भारतीय जनता पक्षाची खुळं आहेत. त्यांचे प्रचारक आहेत. त्याच्यासाठी भारतीय जनता पक्षाचे फार मोठा आर्थिक बजेट आहे आणि त्यांनी त्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य, त्यांची भूमिका त्यांचा स्वराज्याचा विचार हा तोकडा करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे राऊत म्हणाले. शिवाजी महाराज जर आता असते तर अशा विचारांच्या लोकांनाचा त्यांनी कडेलोट केला असता. असे लोक निर्माणच झाले नसते, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सरसंघचालक या दोन प्रमुख मान्यवर व्यक्ती ज्यांना महाराष्ट्राच्या इतिहासाचं भान असायला हवं. त्यांच्या उपस्थितीत अशा बुवा आणि महाराजांना आणून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड करण्याचं कारण काय? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराज हे इतिहासातील आपल्या उर्जेचे, उत्साहाचे शौर्याचे अखंड प्रवाह होते. ते कधी थकले नाही, ते कधी झुकले नाही. म्हणून आमचा महाराष्ट्र देखील कधी थकत नाही आणि दिल्लीपुढे झुकत नाही, असे संजय राऊत म्हणाले.
बागेश्वर बाबा, महाराज जे कोणी आहेत ते जो नवीन इतिहास बदलतायत, हे महाराष्ट्राला मान्य नाही. खरं म्हणजे ते बुवा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतं होते तेव्हा मुख्यमंत्र्यांनी किंवा सरसंघचालकांनी त्यांना थांबवायला हवं होतं. आणि त्यांना महाराष्ट्राच्या भावना आणि इतिहासाबाबत जाणीव करून द्यायला हवी होती, अशा शब्दात संजय राऊतांनी खडसावले. ते बुवा म्हणजे या पृथ्वी तलावरची महान व्यक्ती नाही. वय काय त्यांच? अभ्यास काय आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
बागेश्वर बाबा म्हणतात चार मुलं जन्माला घाला. आधी तुम्ही 4 मुलं जन्माला घाला. तुम्ही ब्रह्मचारी, तुमचं लग्न झालेलं नाही आणि दुसऱ्यांना सांगताय चार मुलं जन्माला घाला. एक मूल आरएसएसला द्या, असही म्हणतात. तुम्ही ५ -२५ मुलं जन्माला घाला आणि हवी तेवढी द्या काही हरकत नाही. हे जे संत बुवा महाराजांनी ही सुरुवात स्वतःपासून करायला हवी. हे हिंदुत्व नाही. भाजपा किंवा संघ ज्या हिंदुत्वाचा सध्या या माध्यमातून पुरस्कार करते किंवा खरात बाबा सारखे लोक हे त्यांचे प्रचारक आहेत. हे हिंदुत्व अजिबातच नाही, असे राऊत म्हणाले.
एकाबाजूला तुम्ही लोकसंख्या नियंत्रणासाठी सरकार मंत्रालय स्थापन करता आणि कोट्यावदी रुपये खर्च करताय आणि दुसऱ्या बाजूला अशा माध्यमातून तुम्ही लोकसंख्या वाढवण्याचा प्रचार करताय. हे बाबा असं का नाही बोलले की एक मूल प्रत्येकाने आपलं भारतीय सैन्यात दाखल व्हायला पाहिजे असं का नाही बोलले. जर एक मूल बलिदानासाठी, भारतीय राष्ट्र सेवेसाठी दिले असते तर आम्ही त्याचे स्वागत केले असते. हे त्यांना का सुचत नाही? हे जर दुसरं कोणी बोललं असतं तर आतापर्यंत भाजप शिवरायांचा अपमान झाला हो…. असे म्हणत रस्त्यावर उतरले असते. दुर्देवाने महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची अशा प्रकारे त्यांच्या इतिहासाची मोडतोड करणं चुकीचं आहे. शिवाजी महाराजांना थकलेल कोणी पाहिलं का? झुकलेले कोणी पाहिले का? त्यांच्या लढायांनी औरंगजेबाला थकवलं. या शिवाजी महाराजांनी न थकता अफजल खानाचा कोथळा काढला, शाहीस्ते खानाची बोटं छाटली आणि तुम्ही त्यांना थकलेला माणूस म्हणता. तुम्हाला हे कुठून सुचत? काय पिता काय तुम्ही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
गोविंदराव पानसरे यांचे 40 वर्षांपूर्वीचं पुस्तक आहे. त्यामध्ये कुठेही छत्रपतींची बदनामी नाही. हे सगळं जाणीवपूर्वक सुरू आहे. महाराष्ट्रात राज्याचे मुख्यमंत्री, सरसंघचालक व्यासपीठावर असताना हे विधान केलं जात. महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी यांच्या संवेदना मेलेल्या आहेत. त्यांना शिवाजी महाराजांविषयी अजिबात प्रेम नाही. दहा वर्षापूर्वी नरेंद्र मोदीनी शिवाजी महाराजांबरोबर आपले स्वतःचे होर्डिंग लावले होते. मग आता ते थकले का आता? मोदी थकले की भाजपा थकली. हे मूर्ख आहेत आणि यांना डोक्यावर बसून ठेवलेला आहे हे महाराष्ट्राचे शत्रू असल्याचे संजय राऊत म्हणाले.
Comments are closed.