मराठी विरोधी गटावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी! संजय राऊत यांची मागणी
परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सीचालकांना यापुढे प्रवाशांसोबत मराठी भाषेतून बोलावे लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या महाराष्ट्र दिनापासून (1 मेपासून) केली जाणार असल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. मात्र या निर्णयाला विरोध करण्यासाठी सरकारमध्येच दोन गट पडल्याचे दिसून आले. यावरून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मराठी विरोधी गटावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
रविवारी माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, सरकारमध्ये मराठीच्या मुद्द्यावरती दोन गट पडता कामा नयेत. हे मराठी राज्य आहे, काही दिवसात 1 मे महाराष्ट्र दिन येतो आहे. 106 हुतात्मे मराठी आहेत ज्यांनी या महाराष्ट्रासाठी रक्त सांडलय. अशा वेळेला मराठीच्या मुद्द्यावर जर दोन गट पडत असतील तर मराठी विरोधी जो गट आहे त्यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
दुसरीकडे मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या नामकरणावरून वाद निर्माण झाला आहे. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नाव न बदलता रुग्णालयाची दुरूस्ती करण्याची मागणी केली. यावर राऊत म्हणाले की, नाव बदलण्याच्या मागणीला अर्थ नाही. मंगल प्रभात लोडा हे एक बिल्डर आहेत. त्यांचा एक ट्रम्प टॉवर नावाचा टॉवर आहे. आधी त्याचं नाव बदला आणि त्या ट्रम्प टॉवरच छत्रपती शिवाजी महाराज टॉवर असं नाव करा, असे राऊत यावेळी म्हणाले.
Comments are closed.