अ‍ॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करा; मेळघाटच्या जादूटोण्याच्या मारहाण प्रकरणी अनिसची मागणी

अमरावती क्राईम न्यूज : मेळघाटात जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध महिलेची धिंड काढत मारहाण करणे ही माणुसकीला काळीमा फासणारी बाब आहे. जादूटोण्याच्या संशयावरून (Crime News) मारहाण करणे, धिंड काढणे हा कायद्याने गुन्हा आहे. परिणामी, या प्रकरणामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. या संदर्भातील गुन्हेगारांवर कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणी अनिसचे हरीश केदार यांनी केली आहे. तसेच पीडीतेला शासनाने सुरक्षा पुरवली पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. अशी मागणी ही केदार यांनी केली आहे.

वृद्ध महिलेची काढली धिंड, दोरखंडाने बांधलं, चटकेही दिले

मेळघाटातील रेट्याखेडा गावात जादूटोण्याच्या संशयावरून एका 77 वर्षीय आदिवासी महिलेची धिंड आणि अन्य अघोरी प्रकार केल्याचा प्रकार समोर आला आहे. 30 डिसेंबरची ही घटना असून तब्बल 18 दिवसांनी म्हणजे काल 17 तारखेला हा प्रकार समोर आला. चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेडा येथील 77 वर्षीय आदिवासी वृद्धा नेहमीप्रमाणे पहाटे 4 वाजता शौचास घराबाहेर पडली तेव्हा या वृद्धेवर शेजाऱ्यांनी जादूटोण्याचा आळ घेत तिला दोरखंडाने बांधले अन् मारहाणही केली. त्यांनी तिला गरम सळाखीचे चटके, मिरचीची धुनीही दिली. इतकंच नव्हे तर पुढे तोंडाला काळे फासले असून एवढ्यावरच हा अघोरी प्रकार थांबला नाही, तर त्या वृद्धेच्या डोक्यावर गाठोडे देऊन चक्क धिंड काढून तिला गावातून बेदखल केले.

पोलीस पाटलांचाही सहभाग

धक्कादायक बाब म्हणजे यात गावाचा पोलीस पाटील देखील सहभागी झाला होता. समाजमन सुन्न करणारा आणि पुरोगामी महाराष्ट्राला लाजविणारा हा धक्कादायक प्रकार चिखलदरा तालुक्याच्या रेट्याखेडा येथे 30 डिसेंबर रोजी घडला. मात्र, तो 17 जानेवारीला उघडकीस आला. पिडीत कुटुंबाने न्यायाच्या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. पोलिसांत तक्रार करूनही न्याय न मिळाल्याने राज्याचा महिला आयोग, पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक आणि धारणी उपविभागीय अधिकारी यांना या तक्रारीची प्रत पाठविण्यात आली आहे.

तीन वर्षीय चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ कडकडीत बंद

येवदा पोलीस स्टेशन हद्दीतील एका 65 वर्षीय नराधमाने 3 वर्षीय चिमुकलीवर केलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज येवदा गावासह परिसरातील विविध गावात बंद पुकारण्यात आला आहे.  या बंदला व्यापारी वर्गानी सुद्धा प्रतिसाद दिला असून आज दुकाने बंद ठेवली आहेत. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Comments are closed.