चौंडीला मंत्रिमंडळ बैठक, मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री अहिल्यादेवींच्या नगरीत, कोणकोणते निर्णय ह
Maharashtra Cabinet Meeting at Chaundi Ahilyanagar : मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर नंतर आज इतिहासात प्रथमच अहिल्यानगरच्या चौंडीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला असून आजच्या या ऐतिहासिक कॅबिनेट माध्यमातून धनगर समाजाच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजच्या बैठकीत कुठले निर्णय घेण्यात येणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला अभूतपूर्व जनादेश मिळाला. या निवडणुकीत राज्यभरातील धनगर समाज भाजपच्या बाजूने उभा राहिलेला दिसला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीक्षेत्र चौंडी येथे आज मंत्रिपरिषदेच्या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला सर्व मंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, अशी मागणी सातत्याने धनगर समाजाकडून सुरू आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत धनगर आरक्षणाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते. राज्य सरकारने तसा ठराव केंद्र सरकारला पाठवला आहे. मात्र, धनगर आरक्षणाची मागणी प्रलंबित असताना राज्य सरकारने अनुसूचित जमातीला मिळणारा शासकीय लाभ धनगर समाजाला देण्याचा निर्णय घेतला आहे.
तरीही आज पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जन्मगावी राज्य मंत्रिपरिषदेची बैठक होत असल्याने या बैठकीत काही मंत्र्यांकडून धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो. दरम्यान, श्रीक्षेत्र चौंडी येथील नियोजित 550 कोटी रुपये खर्चाच्या अहिल्यादेवी सृष्टीसह अन्य विकासकामांना निधी देण्याचा निर्णय बैठकीत होऊ शकतो. ही शिल्पसृष्टी चौंडी येथे की चास येथे होणार यावरही बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यातील धार्मिक पर्यटन, ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन यासह अनेक विकासकामे मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे. शेजारच्या मध्यप्रदेश सरकारने अहिल्यादेवींच्या राज्याची राजधानी राहिलेल्या महेश्वर येथे त्रिशताब्दी वर्षानिमित्त मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली होती. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील अहिल्यादेवींचे जन्मगाव असलेल्या चौंडी येथे त्रिशताब्दी जन्म वर्षानिमित्त मंत्रिमंडळ बैठक आयोजित केली आहे. या बैठकीच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अभिवादन केले जाणार आहे. आजच्या बैठकीत नेमके कोणते निर्णय घेतले जाणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
https://www.youtube.com/watch?v=-opp22d5cbo
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.