नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन इतका वाद का रंगला?; नेमकं दोन जिल्ह्यांमधील ‘राज’कारण काय

रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री : रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीत एकमत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे नाशिक आणि रायगडमधील पालकमंत्र्यांची निवड रद्द करण्यात आली आहे. याबाबत शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदी अदिती तटकरे (Aditi Tatkare) आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र काही तासांनंतरच अदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांची नियुक्ती रद्द करण्यात आली.

पालकमंत्र्यांची यादी (Maharashtra Guardian Minister List) जाहीर झाली तेव्हा रायगडचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे, तर नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपच्या गिरीश महाजन यांना देण्यात आलं होतं. अदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी निवड होताच शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी नाराजी दर्शवली होती. तसेच भरत गोगावले यांच्या समर्थकांनी रात्री मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची निवड झाल्याने शिवसेना शिंदे गटाच्या दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या समर्थकांनी नाराजी दर्शवली. त्यानंतर राज्य सरकारने शासन निर्णय जाहीर करत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस स्थगिती दिली. त्यामुळे आता रायगड आणि नाशिक जिल्हाच्या पालकमंत्रिपदी कोणाची वर्णी लागते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन इतका वाद का रंगला?

रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिंदेसेनेने दावा केला होता. रायगड जिल्ह्यात शिंदेसेनेचे तीन आणि भाजपचे तीन आमदार आहेत. शिंदेसेनेचे भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रिपद हवे होते, पण जिल्ह्यात अजित पवार गटाचा एकच आमदार असूनही पालकमंत्रिपद अदिती तटकरेंना देण्यात आले होते. त्यामुळे शिवसेना शिंदे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच अदिती तटकरेंची पालकमंत्रिपदी निवड होताच मला दुसऱ्या कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद नको, अशी भूमिका भरत गोगावले यांनी घेतल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, भरत गोगावले हे सुध्दा सुरुवातीपासून रायगडच्या पालकमंत्री पदासाठी कायम इच्छुक राहिलेत. मात्र सुनील तटकरे यांचं केंद्रापर्यंत असलेलं वजन पाहता त्यांनी अदिती तटकरे यांच्या गळ्यात ठाकरे सरकार काळात पालकमंत्री पदाची माळ पाडून घेतली होती.

नाशिक जिल्ह्यात अजित पवार गटाचे सर्वाधिक सात आमदार-

नाशिकच्या पालकमंत्रिपदी महायुतीत शिंदेसेनेचे दादा भुसे होते. नाशिकचे पालकमंत्रिपद भाजपने घेऊन तिथे गिरीश महाजन यांची नियुक्ती केल्याने भुसे नाराज होते, त्यातून त्यांनी कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री न घेण्याचे ठरवले होते असे समजते. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात अजित पवार गटाचे सर्वाधिक सात आमदार आहेत, तर भाजपचे पाच आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नाशिक जिल्ह्यातील मंत्री माणिकराव कोकाटे यांना नंदुरबारचे पालकमंत्रिपद दिल्याने नाराजी होती.

संबंधित बातमी:

Dada Bhuse: गिरीश महाजन यांचं नाशिकचं पालकमंत्रिपद जाताच शिवसेनेच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, दादा भुसे यांना….

अधिक पाहा..

Comments are closed.