आरोग्य विभागातील बदल्या कौन्सिलिंगद्वारे करणार, बदल्यांमध्ये ‘बाह्य’ हस्तक्षेप नको; आरोग्य विभागाचे आदेश जारी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मंत्रालयात सध्या बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागातील बदल्यांसाठी (समुपदेश) कौन्सिलिंग  केले जाणार असून कोणत्याही प्रकारचा बाह्य दबाव अथवा हस्तक्षेप सहन केला जाणार नसल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. दुर्गम भागातील सेवेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने आठ परिमंडळातील सर्व कार्यक्रम प्रमुख यांच्या बदल्यांचे टप्प्याटप्प्याने वेळापत्रक जाहीर केले आहे. जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार रिक्त पदांची यादी 6 मे 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर बदलीपात्र कर्मचाऱयांची सेवा ज्येष्ठता यादी 8 मे 2026 रोजी प्रसिद्ध केली गेली. तसेच प्रपत्र 1 ते 5 तयार करून नागरी सेवा मंडळासमोर 10 मे 2026 रोजी सादर करण्यात आली. नागरी सेवा मंडळाकडून समुपदेशनाने बदलीचे अंतिम प्रस्ताव 15 मे 2026 पर्यंत पाठविण्यात येणार आहेत. समुपदेशनाद्वारे करण्यात आलेल्या अंतिम बदल्यांचे आदेश 31 मे रोजी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या सर्व बदली प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी चार वरिष्ठ अधिकाऱयांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या नव्या धोरणानुसार बदल्या करताना सेवा कालावधी, प्राधान्यक्रम, पसंतीक्रम, प्रशासकीय गरज तसेच दुर्गम भागातील सेवेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. अपंग कर्मचारी, गंभीर आजारांनी ग्रस्त कर्मचारी, विधवा महिला, पती-पत्नी एकत्रीकरण आणि शैक्षणिक कारणे यांसारख्या मानवी बाबींनाही प्राधान्य देण्यात आले आहे.

Comments are closed.