महाराष्ट्रात सरकारी रुग्णालयात जाण्याचे प्रमाण अत्यल्प, खासगी रुग्णालयात उपचार घेण्यात रुग्णांचा भर
महाराष्ट्रात पाचपैकी फक्त एकच रुग्ण सरकारी रुग्णालयांचा आधार घेतो, अशी माहिती राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (NSO) 80 व्या फेरीतील आरोग्य खर्च सर्वेक्षणात समोर आली आहे. राज्यातील तब्बल 77 टक्के रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होतात, तर केवळ 18.6 टक्के रुग्ण सरकारी रुग्णालयात उपचार घेतात. देशातील हा सर्वात कमी टक्का असल्याचे मत जनस्वास्थ्य अभियानाचे डॉ. अभय शुक्ला यांनी व्यक्त केले आहे.
तमिळनाडूत 43 टक्के, राजस्थानात 45.3 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 58.8 टक्के आणि गोव्यात 64.7 टक्के रुग्ण सरकारी रुग्णालयांचा वापर करतात, तर देशाची सरासरी 36.7 टक्के आहे. त्यामानाने महाराष्ट्रात सरकारी आरोग्य व्यवस्थेचा वापर अत्यल्प असल्याचे चित्र समोर आले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
राज्यात आरोग्य खर्चात मोठी वाढ झाली असून खासगी रुग्णालयातील उपचारांचा खर्च झपाट्याने वाढला आहे. ग्रामीण भागात खासगी रुग्णालयात दाखल होण्यासाठी सरासरी 44,580 हजार रुपये, तर शहरी भागात 67,831 हजार रुपये खर्च येतो. 2017-18 मध्ये हा खर्च अनुक्रमे 23,821 हजार रुपये आणि 42,540 हजार रुपये होता. म्हणजेच ग्रामीण भागात खर्चात तब्बल 87 टक्के वाढ झाली आहे.
डॉ. शुक्ला यांच्या मते, 2018 ते 2025 दरम्यान सर्वसाधारण महागाई सुमारे 43 टक्के असताना खासगी रुग्णालयांचे दर जवळपास दुपटीने वाढले आहेत. हे अनियंत्रित आणि नफेखोर खासगी आरोग्य व्यवस्थेचे द्योतक असल्याची टीका त्यांनी केली.
सरकारी रुग्णालयांमध्येही खर्च वाढल्याचे दिसते. ग्रामीण भागात उपचारासाठी रुग्णांना सरासरी 8,080 हजार रुपये तर शहरी भागात ₹8,364 हजार रुपये स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागतो. यातील मोठा खर्च औषधे आणि तपासण्यांवर होतो, जे प्रत्यक्षात मोफत मिळणे अपेक्षित असते.
सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) यांसारख्या विमा योजनांमुळे पुरेसे आर्थिक संरक्षण मिळत नसल्याचेही अहवालात नमूद आहे. जरी कागदोपत्री 5 लाख रुपयांपर्यंत कवच दिले जात असले तरी प्रत्यक्षात महाराष्ट्रात सरासरी रुग्णालय खर्च 44,778 हजार रुपये असून त्यातील 40,495 हजार रुपये (सुमारे 90 टक्के) खर्च रुग्णांना स्वतः करावा लागतो.
कोविड काळात राज्यात सर्वाधिक मृत्यू झाले असतानाही सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका डॉ. शुक्ला यांनी केली. त्यांनी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासोबतच खासगी रुग्णालयांवर कडक नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त केली आहे.
Comments are closed.