ठाकरेंची शिवसेना विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार, ‘या’ नेत्यांची नावं आघाडीवर
मुंबई : ठाकरेंची शिवसेना (Thackeray Group Shiv Sena) लवकरच विरोधी पक्षनेते पदाचा दावा विधानसभा अध्यक्षांकडे करणार आहे. आज मातोश्रीवर (Matoshree) आमदारांची बैठक झाली. या बैठकीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात पक्षाशी रणनीती आणि विरोधी पक्ष नेते पदासंदर्भात चर्चा झाली आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव, आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांच्या नावावर विचार झाल्याची माहिती मिळत आहे. अनुभव आणि विषय मांडण्याची आक्रमकता पाहता भास्कर जाधव यांचं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आमदारांच्या बैठकीत नेमकं काय झालं?
विरोधी पक्षनेते पदा संदर्भात विधानसभा विधान परिषद आमदारांसोबत तासभर उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली आहे. आपणच आपल्यापैकी नाव विरोधी पक्षनेते पदासाठी सांगावं असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना सांगितलं आहे. मात्र, पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील सर्व आमदारांना मान्य असेल असं मत बैठकीत आमदारांकडून व्यक्त करण्यात आलं आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून दावा केला जात असताना नाव जरी समोर आलं नसलं तरी पत्रावर सर्व आमदारांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, विरोधी पक्षनेता नेमकं कोण होणार याचा निर्णय अद्याप झाला नसला तरी भास्कर जाधव, आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांची नावं आघाडीवर आहेत.
महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनांही विश्वासात घेणार
विरोधी पक्षनेते पदासाठीच ठाकरेंच्या शिवसेनेकडून पत्र लवकरच विधानसभा अध्यक्षांना देण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेते पदावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून दावा सांगत असताना महाविकास आघाडीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस या दोन पक्षांना सुद्धा विश्वासात घेतलं जावं यासंदर्भात नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. त्यामुळे मित्र पक्षांसोबत सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चर्चा करणार आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर दावा करत असताना विधान परिषद विरोधी पक्षनेते संदर्भात काय करायचं यावर सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांसोबत चर्चा केली आहे. सोबतच राज्यातील सध्याचे विषय खास करुन सर्वसामान्यांच्या अडचणी मुंबई आणि ग्रामीण भागातील विषय या सगळ्या संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणते नेमके महत्त्वाचे विषय मांडायचे यावर आमदारांसोबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.
https://www.youtube.com/watch?v= pbz1_6ixyia
महत्वाच्या बातम्या:
Devendra Fadnavis On Neelam Gorhe: देवेंद्र फडणवीसांनी नीलम गोऱ्हेंचे टोचले कान; म्हणाले, साहित्य संमेलनात बोलताना काही…
अधिक पाहा..
Comments are closed.