96 गुण मिळूनही अपात्र, 46 गुण घेणारा उमेदवार पात्र! चुकीच्या निवड पद्धतीमुळे गुणवंतांच्या स्वप्नावर वरवंटा, MPSC ची निवड प्रक्रिया वादात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) निवड प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लेखी परीक्षेत 96 गुण मिळवणाऱ्या उमेदवाराला मुलाखतीत एक गुण कमी मिळताच घरी पाठवले गेले. मात्र लेखी परीक्षेत कमी गुण मिळवणारा उमेदवार मुलाखतीत अवघे 46 गुण मिळूनही पात्र ठरला. सहाय्यक संचालक (माहिती) भरती प्रक्रियेत हा प्रकार उघड झाला आहे. केवळ चुकीच्या निवड पद्धतीमुळे गुणवंत उमेदवारांचे सनदी अधिकारी बनण्याचे स्वप्न भंगल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील सहाय्यक संचालक (माहिती) या संवर्गातील 26 पदांच्या भरतीसाठी आयोगामार्फत 30 डिसेंबर 2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. एमपीएससीच्या जाहिरात क्र. 131 अंतर्गत सहाय्यक संचालक (माहिती) पदाच्या या भरती प्रक्रियेतील गुण आणि त्याआधारे केलेल्या निवडीवर उमेदवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. लेखी परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवूनही केवळ मुलाखतीत पात्रतेसाठी आवश्यक गुणांपेक्षा एक गुण कमी मिळाल्याने अंतिम निवडीपासून वंचित राहावे लागल्याची नाराजी उमेदवारांनी व्यक्त केली. लेखी परीक्षा व मुलाखत या दोन्ही टप्प्यांतील गुणांची एकत्रित बेरीज करून अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात यावी. सध्याच्या पद्धतीत मुलाखतीसाठी निश्चित किमान गुणांची अट असल्यामुळे लेखी परीक्षेत जास्त गुण मिळवलेल्या उमेदवारांनाही अपात्र ठरवले जात असल्याचे म्हणणे काही उमेदवारांनी मांडले आहे.

n एमपीएससीच्या परीक्षेसाठी उमेदवार प्रचंड मेहनत घेतात, दिवसरात्र अभ्यास करतात, त्यांच्या लेखी परीक्षेतील गुणांची कदर न करणे आणि केवळ मुलाखतीतील गुणांच्या आधारे कमी गुणवत्तेच्या उमेदवारांना पात्र ठरवणे खूप अन्यायकारक आहे, अशी प्रतिक्रिया निवडीपासून वंचित राहिलेल्या काही उमेदवारांनी दिली आहे.

मुलाखतीला महत्त्व, ‘लेखी’ची गुणवत्ता व्यर्थ!

भरती प्रक्रियेतील उमेदवार निवडीचा अंतिम निर्णय जर मुलाखतीतील पात्रता गुणांवरच अवलंबून असेल, तर लेखी परीक्षा घेण्याचा उद्देशच काय? असा प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केला आहे. अनेक उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी महिनोन्महिने मेहनत घेतली, चांगले गुण मिळवले. मात्र मुलाखतीत एक गुण कमी पडल्याने त्यांची संपूर्ण गुणवत्ता दुर्लक्षित केली. मुलाखतीला महत्त्व दिल्याने लेखी परीक्षेची गुणवत्ता व्यर्थ गेल्याची नाराजी उमेदवारांनी व्यक्त केली.

उमेदवारांचे संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

एमपीएससीच्या निवड प्रक्रियेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकार आणि एमपीएससीने निवडीच्या निकष आणि नियमांतील अन्याय दूर करावा, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. राज्यसेवा परीक्षांमध्ये लेखी व मुलाखतीचे गुण एकत्र करून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्याच धर्तीवर एकूण गुणांचा विचार व्हावा, असे काही उमेदवारांचे म्हणणे आहे.

Comments are closed.