अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक आले, 13 जूनला दुसरी गुणवत्ता यादी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीची लगबग संपल्यानंतर आता शिक्षण संचालनालयाने दुसऱ्या फेरीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिल्या फेरीमध्ये प्रवेश न मिळालेल्या किंवा काही कारणास्तव नोंदणी करू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही दुसरी फेरी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. यासंदर्भातील माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली  आहे. त्यानुसार, शनिवार, 6 जूनपासून दुसऱ्या फेरीसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. 13 जून रोजी सकाळी 11 वाजता दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण संचालनालयाने दिली.

अर्जात दुरुस्ती आणि पसंतीक्रम नोंदवणे

नवीन वेळापत्रकानुसार, विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी त्यांच्या अर्जात आवश्यक ते बदल करण्याची संधी देण्यात आली आहे. या फेरीदरम्यान सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज तात्पुरते खुले म्हणजेच अनलॉक करण्यात येणार असल्याने सर्वांनी आपला अर्ज पुन्हा काळजीपूर्वक तपासून लॉक करणे बंधनकारक आहे.  6 जूनपासून सकाळी 8 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये लॉग इन करून दुरुस्ती करता येईल.

ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत काही कारणांमुळे आतापर्यंत अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी नोंदणी किंवा अर्ज भरलेला नाही अशा सर्व इच्छुक विद्यार्थ्यांना शिक्षण संचालनालयाने आणखी एक सुवर्णसंधी दिली आहे. हे  विद्यार्थीदेखील 6 जून ते 9 जून या कालावधीत नवीन नोंदणी करून आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकतात.

13 जून रोजी दुपारी 12 वाजल्यापासून 16 जून रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन आपल्या कागदपत्रांची पडताळणी करावी लागेल.

Comments are closed.