गुंतवणूकदारांसाठी ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ची स्थापना, मुख्यमंत्र्यांकडून शिंदे गटाच्या उद्योग विभागावर कुरघोडी
राज्यात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र गुंतवणूक प्रोत्साहन संस्था इन्व्हेस्ट महाराष्ट्रची स्थापना करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली इन्व्हेस्ट महाराष्ट्र ही संस्था राज्यातील उद्योग, व्यापार आणि परकीय थेट गुंतवणुकीला जागतिक स्तरावर मोठी चालना देण्याचे काम करणार आहे. राज्यातील उद्योगमंत्री हे खाते शिंदे गटाकडे असले तरी इन्व्हेस्ट महाराष्ट्र ही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर कुरघोडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
इन्व्हेस्ट महाराष्ट्र संस्था गुंतवणूक आकर्षण व सुलक्षीकरणासाठी तसेच गुंतवणूक प्रोत्साहन आकर्षणावर लक्ष केंद्रित करणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), राज्य गुंतवणूक व्यापार व गुंतवणूक सुलभीकरण कक्ष (मैत्री), उद्योग संचालनालय, महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशीप लिमिटेड (एमआयटीएल) तसेच राज्यातील इतर संबंधित संस्थांबरोबर समन्वय साधून जागतिक व देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या सर्वांगीण गरजा पूर्ण करण्यासाठी कार्य करेल. ही सेवा अर्थव्यवस्थेतील प्राथमिक, दुय्यम आणि तृतीयक अशा सर्व क्षेत्रांतील गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. या संस्थेसाठी 3 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
Comments are closed.