घरगुती गॅसचा काळाबाजार उद्ध्वस्त २२५ गॅस सिलिंडर जप्त, दोघांना पकडले; गुन्हे शाखेची अंधेरीत कारवाई

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

घरगुती गॅस सिलिंडर तुटवड्यामुळे लोक मेटाकुटीला आले असताना याचाच गैरफायदा उचलत अंधेरी येथे दोघे जण घरगुती गॅसचा लपूनछपून काळाबाजार करत होते. मोठ्या सिलिंडरमधील गॅ स छोट्या सिलिंडरमध्ये भरून त्याची चढ्या भावाने विक्री करण्याचा सुरू असलेला गोरखधंदा गुन्हे शाखा युनिट-९ ने उद्ध्वस्त केला.

अंधेरीच्या न्यू लिंक रोडवरील शितलादेवी को-ऑपरेटिंग हाऊसिंग सोसायटीतल्या अरिहंत ट्रेडर्स शॉप नंबर ४ मध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार केला जात असल्याची माहिती युनिट ९ ला मिळाली. याची तत्काळ गंभीर दखल घेत उपायुक्त
नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक सचिन पुराणिक यांच्या नेतृत्वाखाली सपोनि श्रीराम घोडके, उपनिरीक्षक स्नेहल तागमोगे, तसेच म्हाळसंक, शेळके, सोनावणे या पथकाने गुरुवारी रात्री उशिरा अरिहंत ट्रेडर्स या शॉपवर छापा टाकला. त्या वेळी शमशुद्दीन खान (२३) हा तरुण १४.६ किलोच्या सिलिंडरमधील गॅस चार व दोन किलोच्या सिलिंडरमध्ये रेग्युलेटर आणि प्लॅस्टिक गॅस फिलिंग पाईपच्या सहाय्याने धोकादायकपणे भरताना रंगेहाथ आढळून आला. त्यानंतर पथकाने शमशुद्दीन व शॉपचा मालक वाडीलाल ओथी गड्डा (५७) या दोघांना ताब्यात घेऊन डी. एन. नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

२२५ गॅस सिलिंडरचा साठा जप्त
चौकशीत हे दोघे गॅस तुटवड्याचा गैरफायदा घेऊन मोठ्या सिलिंडरमधील गॅस हलगर्जीपणे लहान सिलिंडरमध्ये भरून ते सिलिंडर अवाच्या सवा किमतीत विकत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून १४ किलोचे ३०, चार किलोचे १० आणि दोन किलोचे शेकडो असे २२५ सिलिंडर जप्त करण्यात आले.

Comments are closed.