महाराष्ट्रात दिवसभरात उष्माघाताचे 2 बळी, @ 47… अकोल्यात सर्वाधिक तापमान
सूर्य कोपल्याने महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत पाऱ्याने 45 अंश सेल्सिअसचा आकडा पार केल्याने उकाडा असह्य झाला आहे. देशात उष्माघातामुळे एकाच दिवसात चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये विदर्भातील दोन आणि ओडिशातील दोन जणांचा समावेश आहे. यामुळे महाराष्ट्रातील उष्माघाताने मृत्यू झालेल्यांची संख्या आठवर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारी म्हणून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ‘उष्माघात व्यवस्थापन केंद्र’ सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्रासह ओडिशा, पश्चिम बंगाल, तामीळनाडू, पुद्दुचेरी, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात उष्णतेची लाट आली आहे. असह्य उकाड्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. तीव्र उन्हामुळे नागरिकांना ‘हीट स्ट्रोक’ येण्याचे प्रमाण वाढले आहे.
विदर्भ-मराठवाड्यात कहर
विदर्भ आणि मराठवाडय़ात उन्हाचा कहर झाला आहे. लातूरमध्ये उष्माघाताने मृत्यू होण्याचे सत्र सुरूच आहे. लातूरमधील निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे आज एका 75 वर्षीय शेतकरी त्र्यंबक बेळंबे यांचा शेतात काम करीत असतानाच उष्माघाताने बळी गेला आहे. त्यामुळे लातूरमध्ये उष्माघात बळींची संख्या चारवर गेली आहे, तर जुन्नरमध्ये रूपाली गाडगे (40) या महिलेचा मृत्यू झाला.
- मुंबईत तापमान 36 अंशांपर्यंत नोंद होत असले तरी आर्द्रतेमुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे. यातच पुढील चार दिवस अशीच स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आल्यामुळे धोका वाढला आहे.
मुंबईला धोका, पालिकेने उपाययोजना कराव्यात – अंकित प्रभू
– मुंबईमध्ये सध्या उष्माघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून हे वाढते तापमान विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरत आहे. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन मुंबई महानगरपालिकेने युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रभाग क्र. 54 चे नगरसेवक अंकित प्रभू यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे.
Comments are closed.