80 ठिकाणी पाणी तुंबणार, पालिका मुंबईत बसवणार 547 पंप
मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांमध्ये सुमारे 80 ठिकाणी पाणी तुंबण्याचा धोका आहे. पाणी तुंबणाऱ्या एकूण 93 ठिकाणांपैकी 13 ठिकाणी पावसाळय़ापूर्वी आवश्यक यंत्रणा बसवण्यात येणार असल्यामुळे या ठिकाणी पाणी तुंबणार नाही. मात्र शिल्लक 80 ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. या स्पॉटवर पाणी तुंबून मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून 547 उच्च क्षमतेचे पाणी उपसा पंप लावण्यात येणार आहेत. यामध्ये शहरात 146 पंप, पूर्व उपनगरात 178, तर पश्चिम उपनगरात 233 पंप लावण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून आज देण्यात आली.
मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबू नये यासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये नालेसफाईवर विशेष भर देण्यात येत असून पंप बसवण्याचे कामही वेगाने सुरू आहे. पाणी साचण्याच्या ठिकाणांच्या निर्मितीमागची कारणे तपासणे आणि पाण्याचा निचरा होणारे मार्ग स्वच्छ करून त्यात कोणताही अडथळा उद्भवणार नाही यासाठी आवश्यक ती कार्यवाही नियमितपणे व वेळोवेळी करण्यात येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत 515 पंपांची संख्या वाढवून ती 547 करण्यात आली आहे. शिवाय पाणी तुंबण्याची तक्रार करण्यासाठी 1916 टोल फ्री क्रमांक आणि वेबसाईटवर नागरिकांना तक्रार करता येणार आहे.
अशा आहेत उपाययोजना
पाणी तुंबू नये यासाठी सहा उच्च क्षमतेचे पंपिंग स्टेशन आणि दहा मिनिपंपिंग स्टेशन्स 1 मेपासूनच कार्यान्वित करण्यात येणार आहेत. तर गतवर्षीप्रमाणे मान्सूनपूर्व पावसाची शक्यता लक्षात घेता 15 मेपासून सर्व पंप कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
पुराची ठिकाणे नियंत्रण कक्षात ऑनलाइन लाइव्ह
पंपचालकांसमवेत समन्वय साधण्यासाठी नियंत्रण कक्षात पंपचालक प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रत्येक पंपचालक ‘स्मार्ट पह्न’द्वारे संबंधित ठिकाणाचे छायाचित्र नियंत्रण कक्षात उपलब्ध करून देईल. प्रत्येक पंपाच्या ठिकाणी पंपचालकांना दिलेल्या मोबाईल फोनचे त्या ठिकाणाशी Geo-fencing करण्यात येईल.
पाणी साचलेल्या ठिकाणी त्वरित प्रतिसाद देण्यासाठी आणि नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी 10 फिरती डीवॉटरिंग पंप असणारी वाहने (Mount Vehicle) तैनात करण्यात येणार आहेत. प्रत्येक परिमंडळ उप आयुक्तांच्या कार्यालयात म्हणजेच 7 परिमंडळ कार्यालयात प्रत्येकी एक वाहन उपलब्ध असेल.
Comments are closed.