Pandharpur News – उन्हातून आला आणि पत्र्याच्या घरात झोपला, 24 वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्यात सध्या उन्हाच्या तीव्र लाटेने जनजीवन विस्कळीत झाले असून गेल्या काही दिवसांमध्ये 9 महिन्यांच्या बाळासह तीन ते चार जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. या घटना ताज्या असतानाच, आता सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरातही उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिनेश प्रकाश देशमुख असे या 24 वर्षीय तरुणाचे नाव असून उन्हाच्या तडाख्यामुळे मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला असून, यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरमधील दिनेश देशमुख दुपारी उन्हातून घरी परतल्यानंतर त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्याचे घर पूर्णपणे पत्र्याचे असल्याने दुपारच्या वेळी घरातील उष्णता असह्य झाली होती. दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास त्याची प्रकृती खालावली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना तीन दिवसांपूर्वी घडली असून, उन्हाच्या तीव्रतेमुळे एका तरुण मुलाला जीव गमवावा लागल्याने प्रशासकीय पातळीवर चिंतेचे वातावरण आहे.

सध्या पंढरपूरचा पारा 41 वरून थेट 44 अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी 10 वाजल्यापासूनच नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. उष्णतेच्या या भीषण लाटेचा फटका केवळ मानवी जीवनालाच नाही तर वाहनांनाही बसत आहे. यामुळे आता स्थानिक प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Comments are closed.