विधान परिषदेच्या 9 जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होणार; कुणाला किती जागा मिळणार?
विधान परिषद निवडणूक 2026: विधान परिषदेच्या 9 जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपुष्टात येणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडे अतिरिक्त 13 मतं असल्यामुळे महायुतीने आणखी उमेदवार देण्याचे ठरवल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.
दरम्यानविधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता, भाजपचे 5 उमेदवार निवडून येऊ शकतात. मात्र, पक्षाकडे इच्छुकांची यादी खूप मोठी आहे. विशेषतः ज्या नेत्यांना नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत संधी मिळाली नाही, त्यांनी आता विधान परिषदेसाठी ‘फिल्डिंग’ लावायला सुरुवात केली आहे. लवकरच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने भाजपसह इतर पक्षातही उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी चढाओढ सुरू झाल्याचे चित्र आहे.
विधान परिषदेतील पुढील 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार-
उद्धव ठाकरे (शिवसेना – उबाठा)
नीलम गोऱ्हे (शिवसेना)
शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट)
अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट)
गोपीचंद पडळकर (भाजप)
रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
राजेश राठोड (काँग्रेस)
प्रवीण दटके (भाजप)
रमेश कराड (भाजप)
दरम्यान, विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. दुसऱ्या जागेसाठी त्यांना 10 मतांची जुळवाजुळव करावी लागेल, जे सध्याच्या स्थितीत कठीण दिसत आहे.
BJP Vidhan Parishad Election 2026: चर्चेतील प्रमुख नावे
केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजीत सिंह निंबाळकर, राम सातपुतेंसोबतच आणखी काही परिषदेसाठी इच्छुक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर भाजपचे चार आमदार सध्या निवृत्त होत आहेत. रणजीतसिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केणेकर या आमदारांचा यात समावेश आहे. यापैकी कोणाला पुन्हा संधी मिळते की पक्षाकडून नवीन चेहऱ्यांना वाव दिला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.