‘एसआयआर’ची प्रारूप मतदार यादी उद्या प्रसिद्ध होणार, कोणतीही त्रुटी असल्यास हरकत दाखल करता येणार

राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम राबविण्यात आली असून 31 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रारूप यादीत नाव आहे की नाही, याची माहिती आयोगाने दिलेल्या ceo.maharashtra.gov.in, voters.eci.gov.in या वेबसाईटवर बघता येणार आहे. तसेच ‘बीएलओ’कडूनही याची माहिती घेता येईल.

सर्वात आधी यादीत नाव आहे का? हे तपासून घ्या, त्याच सोबतच नावाची स्पेलिंग बरोबर आहे का, वय/जन्मतारीख, पह्टो, पत्ता योग्य आहे का?, मतदार क्रमांक (EPIC) आणि मतदान केंद्र योग्य आहे का, हे ही तपासून घ्यावे. नाव, पत्ता, वय, फोटो इत्यादीमध्ये त्रुटी असल्यास त्यासाठी दावा/हरकत दाखल करता येईल. नाव, पत्ता, वय, फोटो यात काहीही चूक असेल तर दुरुस्तीसाठी नमुना क्रमांक 8 भरता येईल.

दावे-हरकती दाखल करा

सर्वात महत्त्वाचे, 31 ऑगस्टला यादी पाहिल्यानंतर नाव नसल्यास 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येतील. त्यानंतर त्यावर सुनावणी होईल. नवीन नाव नोंदणीसाठी/वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी नमुना क्रमांक 6 आवश्यक कागदपत्रे आणि घोषणापत्रासह भरणे आवश्यक आहे. यासाठी आधार, जन्म पुरावा, पत्त्याचा पुरावा, 2025 च्या यादीतील तपशीलाचा स्क्रीनशॉट/फोटो, आणि एक पासपोर्ट फोटो असणे आवश्यक आहे.

नाव गायब असेल तर घाबरू नका

प्रारूप यादी म्हणजे अंतिम यादी नाही. नाव वगळले गेले असल्यास 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीत दावा करून नाव समाविष्ट करण्याची संधी आहे. जर 2025 च्या मतदार यादीत नाव होते, पण 2026 च्या प्रारूपमध्ये नाही, तर महाराष्ट्र सीईओच्या एसआयआर पोर्टलवर अशा मतदारांसाठी स्वतंत्र एएसडीडी (Absent/Shifted/Dead/Duplicate) तपासणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Comments are closed.