आशिया कपपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! ही स्टार बाहेर तर ‘या’ खेळाडूचा बदली खेळाडू म्हणून संघात समावेश

भारतीय महिला क्रिकेट संघाला (Indian cricket women’s team) आगामी आशिया कप आणि एशियन गेम्स 2026 पूर्वी मोठा धक्का बसला आहे. संघाची स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues ruled out of asian games due to hamstring injury) दुखापतीमुळे या दोन्ही स्पर्धांमधून बाहेर पडली आहे.

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ‘द हंड्रेड 2026’ स्पर्धेदरम्यान जेमिमाला दुखापत झाली होती, ज्यामुळे तिला त्या स्पर्धेतूनही माघार घ्यावी लागली होती. याच दुखापतीमुळे आता ती आगामी आशिया कप आणि एशियन गेम्समध्येही खेळू शकणार नाही. बीसीसीआईने (BCCI) जेमिमाच्या बाहेर होण्याबाबत अधिकृत घोषणा केली असून, तिच्या जागी नव्या खेळाडूचीही निवड केली आहे. निवडकर्त्यांनी जेमिमाच्या जागी सलामीवीर प्रतिका रावलचा (Pratika Raval) संघात समावेश केला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी, 14 ऑगस्ट रोजी प्रसिद्धीपत्रक जारी करून सांगितले की, 3 ऑगस्ट रोजी इंग्लंडमध्ये ‘द हंड्रेड’ स्पर्धा खेळत असताना जेमिमा रॉड्रिग्जच्या उजव्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती. बंगळुरु येथील सेंटर ऑफ एक्सीलेंसच्या (CoE) वैद्यकीय पथकाने तिची तपासणी केली असता, दुखापत गंभीर असल्याचे स्पष्ट झाले.

त्यामुळे जेमिमा 28 ऑगस्टपासून यूएईमध्ये सुरू होणाऱ्या महिला आशिया कप आणि 17 सप्टेंबरपासून जपानमध्ये होणाऱ्या एशियन गेम्समधून बाहेर झाली आहे. बीसीसीआयच्या महिला निवड समितीने आशिया कपसाठी जेमिमाच्या जागेवर प्रतिका रावलला संघात स्थान दिले आहे. जेमिमा रॉड्रिग्ज ‘द हंड्रेड विमेंस 2026’च्या हंगामात ‘सर्दर्न ब्रेव्ह’कडून खेळत होती. तिथे तिने 6 सामने खेळत 35.75 च्या उत्कृष्ट सरासरीने 143 धावा केल्या होत्या.

यादरम्यान तिचा स्ट्राइक रेट 131.19 इतका होता. मात्र, स्पर्धेच्या मध्यातच तिला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्यामुळे ‘द हंड्रेड’ स्पर्धा सोडावी लागली. त्यानंतर उपचारासाठी ती भारतात परतली आणि बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमधील वैद्यकीय पथकाने तिची तपासणी केली.
दुखापतीचे गांभीर्य पाहता तिला आता आशिया कप आणि एशियन गेम्सच्या भारतीय संघातून वगळण्यात आले आहे.

26 वर्षीय जेमिमा क्रिकेटच्या मैदानावर नेमकी कधी परतणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ती लवकर पूर्णपणे तंदुरुस्त होऊन मैदानात परतावी, अशी आशा संघ व्यवस्थापनाला असेल.

जेमिमा रॉड्रिग्जच्या जागी भारतीय संघात आलेली प्रतिका रावल हिने भारतासाठी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांत पदार्पण केले आहे, पण तिने अद्याप एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. एवढेच नाही तर, ती महिला प्रीमियर लीगमध्येही (WPL) एकही सामना खेळलेली नाही. अशा परिस्थितीत, 25 वर्षीय प्रतिकाला आगामी महिला आशिया कप 2026 च्या प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळते का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

विशेष म्हणजे, प्रतिकाची सध्या केवळ आशिया कप 2026 साठी जेमिमाची बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. ती एशियन गेम्स 2026 मध्ये खेळणार की नाही, याबाबतचा निर्णय संघ व्यवस्थापन नंतर घेईल.

आशिया कप 2026 साठी भारताचा अपडेटेड संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, भारती फुलमाली, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टिरक्षक), जी. कमलिनी (यष्टिरक्षक), अरुंधति रेड्डी, प्रेमा रावत, राधा यादव, श्री चरणी, रेणुका ठाकुर, नंदनी शर्मा, क्रांती गौड़, प्रतिका रावल.

Comments are closed.