अमेरिकन टेक कंपनीचा मोठा निर्णय; AI ला प्राधान्य देण्यासाठी कर्मचाऱ्यांची पगारवाढ थांबवली
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होत असताना अनेक कंपन्या या तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील क्लाउड सॉफ्टवेअर कंपनी टेराडाटा ने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का देणारा निर्णय घेतला आहे. कंपनीने 2026 साठीची वार्षिक पगारवाढ रद्द करून तो निधी AI क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टिव्ह मॅकमिलन यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या अंतर्गत संदेशात सांगितले की, वेगाने बदलणाऱ्या AI बाजारपेठेत कंपनीची स्पर्धात्मकता टिकवून ठेवण्यासाठी आणि भविष्यातील वाढ सुनिश्चित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यामुळे यंदा नियमित वेतनवाढीसाठी राखून ठेवलेला निधी AI तंत्रज्ञान, संशोधन, उत्पादन विकास आणि तज्ज्ञ मनुष्यबळावर खर्च केला जाणार आहे.
या निर्णयाचा परिणाम कंपनीच्या सुमारे 5,100 कर्मचाऱ्यांवर होणार आहे. कंपनीमध्ये दरवर्षी साधारण 2 ते 4 टक्के पगारवाढ दिली जात होती. कंपनीने स्पष्ट केले आहे की उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस, प्रोत्साहनपर रक्कम आणि इक्विटी पुरस्कार मिळण्याची संधी कायम राहील. तसेच हा निर्णय फक्त अशा देशांमध्ये लागू केला जाणार आहे, जिथे कायद्यानुसार वार्षिक वेतनवाढ देणे बंधनकारक नाही. असे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.
AI साठी कर्मचारी लाभांमध्ये कपात करणारी टेराडेटा ही एकमेव कंपनी नाही. तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्या सध्या AI प्रकल्पांसाठी मोठा निधी उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे पारंपरिक खर्चांमध्ये कपात करून नवीन तंत्रज्ञानावर भर देण्याचा कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. जेनीफर माॅस यांच्या मते कंपन्या आता AI गुंतवणुकीसाठी निधी वळवला जात असल्याचे कर्मचाऱ्यांना उघडपणे सांगू लागल्या आहेत. कॉर्पोरेट जगतातील हा बदल पारदर्शकतेचा भाग मानला जात असला, तरी त्याचा कर्मचारी मनोबलावर काय परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात AI मध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी आणखी काही कंपन्या अशाच प्रकारचे कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Comments are closed.