अफगाणिस्तानमध्ये सापडला तेलाचा मोठा साठा, तेल काढण्याची प्रक्रियाही सुरू
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या होर्मुझ संकट आणि मध्यपूर्वेतील तणावाच्या दरम्यान अफगाणिस्तानमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तानच्या उत्तरी जौजजान प्रांतातील अमू दरिया बेसिनमध्ये तेलाचा प्रचंड साठा सापडला असून, तिथून तेल काढण्याची प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू झाली आहे. या शोधामुळे अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य मिळण्याची शक्यता आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
दैनंदिन ५०० क्युबिक मीटर तेलाचे उत्पादन
अफगाणिस्तानच्या खाण आणि पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जौजजान प्रांतातील जमराड साई परिसरातील पाच विहिरींमधून तेल काढण्यास सुरुवात झाली आहे. सध्या या विहिरींमधून दररोज सुमारे ५०० क्युबिक मीटर तेल काढले जात आहे. गेल्या सहा महिन्यांत या भागात ४०० किमीचे नवीन सिस्मिक सर्व्हे करण्यात आले असून, त्यातून तेल आणि वायूच्या अधिक शक्यता समोर आल्या आहेत. जर अफगाणिस्तान तेल निर्यातीत यशस्वी झाला, तर देशातील अनेक दशकांची अस्थिरता आणि गरिबी दूर होण्यास मदत होईल.
अफगाण इंजिनिअर्सनी तीन वर्षे केलेल्या सखोल भौगोलिक सर्वेक्षण, संशोधन आणि ड्रिलिंगनंतर या क्षेत्रातील एकूण १२ विहिरींपैकी पाच विहिरींमध्ये पायलट प्रोडक्शन सुरू झाले आहे. अफगाण सरकारने नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनासाठी मोठे प्लॅन आखले असून, यासाठी देशी आणि परदेशी कंपन्यांशी करार केले आहेत. विशेष म्हणजे २०२३ मध्ये तालिबान सरकारने अमू दरिया बेसिनमधून तेल काढण्यासाठी चीनच्या शिनजियांग सेंट्रल आशिया पेट्रोलियम अँड गॅस कंपनी (CAPEIC) सोबत करार केला होता. या कराराच्या तीन वर्षांनंतर आता तेल उत्पादनात यश मिळताना दिसत आहे.
Comments are closed.