आयसीसीमध्ये मोठी उलथापालथ! जय शाहंच्या टीममध्ये ‘या’ व्यक्तीची एन्ट्री

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (आयसीसी) मोठा बदल झाला आहे. तवेंग्वा मुकुहलानी यांची नोव्हेंबर 2027 पर्यंत उप-अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सध्या झिम्बाब्वे क्रिकेटचे अध्यक्ष आहेत. त्यांची ही नियुक्ती आफ्रिकन क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाच्या वेळी झाली आहे.
आयसीसी बोर्डावर देशाचे प्रतिनिधित्व करणारे मुकुहलानी हे सिंगापूरचे क्रिकेट प्रशासक इम्रान ख्वाजा यांच्या निवृत्तीनंतर उप-अध्यक्षपद स्वीकारणार आहेत.
सध्या मुकुहलानी हे आयसीसीच्या वित्त आणि वाणिज्यिक व्यवहार (एफ अँड सीए) आणि नामनिर्देशन समित्यांवर कार्यरत असून, ते मानव संसाधन आणि मानधन समितीचे अध्यक्ष आहेत. आयसीसीच्या उपाध्यक्षपदी नियुक्त होणारे ते पहिले झिम्बाब्वेचे नागरिक ठरतील.
मुकुहलानी यांच्या या ऐतिहासिक नियुक्तीनंतर आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी त्यांचे अभिनंदन केले. आयसीसीने जाहीर केलेल्या निवेदनात शाह म्हणाले, “मी तवेंग्वा मुकुहलानी यांचे आयसीसीच्या उपाध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करतो.”
“तावेंग्वा यांनी त्यांच्या सहकारी संचालकांचा विश्वास संपादन केला आहे, आणि आपल्या सदस्य राष्ट्रांमध्ये क्रिकेटला बळकट करण्यासाठी व जगभरात या खेळाच्या वाढीसाठी अधिक संधी निर्माण करण्याकरिता त्यांच्यासोबत मिळून काम करण्यास मी उत्सुक आहे. त्यांची निवड हा झिम्बाब्वेसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, कारण ते उप-अध्यक्ष म्हणून काम करणारे पहिले झिम्बाब्वेचे नागरिक ठरले आहेत,” असेही शाह यांनी पुढे म्हटले आहे.
या ऐतिहासिक क्षणाबद्दल मुकुहलानी म्हणाले,“माझ्या सहकारी आयसीसी बोर्ड संचालकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्यामुळे मी अत्यंत सन्मानित झालो आहे आणि आयसीसीच्या उप-अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे.”
झिम्बाब्वे 2027 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि नामिबियासोबत क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे सहआयोजन करणार आहे. या मोठ्या स्पर्धेच्या पार्श्वभुमीवर मुकुहलानी यांनी निवड महत्त्वाची ठरली आहे. तसेच आयसीसी 24 वर्षांत प्रथमच ही प्रमुख स्पर्धा आफ्रिकेत परत आणत असताना मुकुहलानी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभेल. (Major shake-up at the ICC! Tavengwa Mukuhlani has been appointed as Deputy Chair of ICC)
Comments are closed.