पोटनिवडणुकीत भाजपला मोठे यश

सर्व चार जागांवर प्रचंड मताधिक्क्याने झाला विजय

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पदत्यागाच्या मागणीसाठी आंदोलन होत असल्याने राजकीय वातावरण तापलेले असतानाही भारतीय जनता पक्षाने चार राज्यांमध्ये पार पडलेल्या पोटनिवडणुकांमध्ये प्रचंड यश मिळविले आहे. पश्चिम बंगालमधील दोन विधानसभा जागा, तामिळनाडूतील दोन विधानसभा जागा, पुद्दुचेरीतील एका विधानसभा जागा आणि आसाममधील नागांव मतदारसंघातील लोकसभेची पोटनिवडणूक अशा एकंदर सहा पोटनिवडणुकांसाठी 6 ऑक्टोबरला मतदान घेण्यात आले. मतगणना शुक्रवारी करण्यात आली. भारतीय जनता पक्षाने आणि त्याचा मित्रपक्ष असणाऱ्या एन. आर. काँग्रेस या पक्षाने चार जागा जिंकल्या. तर टीव्हीके या पक्षाने तामिळनाडूतील दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळवले.

पाश्चिम बंगालमधील नंदीग्राम मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार हसीरानी रथ यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांच्यावर 1 लाख 22 हजारच्या प्रचंड मताधिक्क्याने विजय मिळविला. ही जागा मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी सोडल्याने रिक्त झाली होती. तर रेजीनगर या मुस्लीमबहुल मतदारसंघातही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शंखारव सरकार हे 75 हजारांच्या मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. त्यांनी या जागेवरचे पूर्वीचे आमदार हुमायुन कबीर यांच्या पुत्राचा पराभव केला. भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष एन. आर. काँग्रेसने पुद्दुचेरीतील थट्टानचावडी या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा 8 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. तामिळनाडूत टीव्हीके या पक्षाच्या उमेदवार के. मरगाथम कुमारवेल यांनी मदुरांतकम मतदार संघात द्रमुकच्या उमेदवारचा 20 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. तर याच राज्यातील धर्मापुरम मतदारसंघात टीव्हीके पक्षाच्या उमेदवार सत्यभामा पी. यांनी द्रमुकच्या उमेदवाराचा 9 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. काँग्रेसची पाटी या निवडणुकांमध्ये कोरीच राहिली.

नागाव लोकसभा मतदारसंघ

आसाममधील नागांव लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवाशीश शर्मा यांनी एआययुडीएफचे उमेदवार मोहम्मद बद्रुद्दिन अजमल यांचा 1 लाख 40 हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला आहे. हा मुस्लीमबहुल मतदारसंघ असूनही येथे भारतीय जनता पक्षाचा हिंदू उमेदवार विजयी झाला आहे. यामुळे भारतीय जनता पक्षाची लोकसभेत एक जागा वाढली असून आता या पक्षाचे लोकसभेतील संख्याबळ 241 इतके झाल्याचे दिसून येते.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून अभिनंदन

या पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळविलेल्या मोठ्या यशामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयी उमेदवारांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. या विजयांमुळे आमचे सामर्ध्य आणखी वाढले आहे. जनता आमच्या पाठीशी आहे, हे आणखी एकदा सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Comments are closed.