इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील

सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपनं विजय मिळवला. या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन सदस्यांनी भाजपला मतदान केलं. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन सदस्यांनी भाजपला मतदान केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देसाई आणि संदिप मांडवे पोलिसांनी अटक केल्यानं मतदान करु शकले नाहीत. यामुळं भाजपनं 33 मतांसह विजय मिळवला. राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे 30 मतं राहिली. भाजपच्या प्रिया शिंदे अध्यक्ष तर राजू भोसले उपाध्यक्ष झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री मकरंद पाटील यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की जे सदस्य फुटले अशा सदस्यांवर अपात्रतेची कारवाई निश्चित होणार आहे.

मकरंद पाटील पुढे म्हणाले की, आज लोकशाहीचा खून झाला.  इतक्या खालच्या पातळीला या जिल्ह्याचे राजकारण याआधी कधीही झालेलं नाही.. हीन पातळीवर आज राजकारण केलं गेलं आहे. पोलीस बाळाचा वापर करून खोटेनाटे गुन्हे दाखल केले गेले आहेत. सभागृहापाशी गेल्यावर आमची हातापायी झाली.दोन मंत्र्यांच्या अंगावर पोलीस येत असतील तर त्याच्यापेक्षा महाराष्ट्र दुर्दैव असू शकत नाही, असंही मकरंद पाटील म्हणाले.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की आपण निवडून येत नाही हे कळाल्यानंतर हे केलेलं षडयंत्र आहे.. यामध्ये प्रशासन पोलीस यंत्रणा सर्व सामील आहेत.  मतदान बजावण्याचा अधिकार असताना सुद्धा पोलिसांनी मतदान करण्यासाठी आलेल्या सदस्यांना सभागृहापासून दूर नेणं हे लोकशाहीत बसत नाही, असं शशिकांत शिंदे म्हणाले. सातारा जिल्ह्यात अशा प्रकारचं आजपर्यंत राजकारण पाहिलेलं नाही ते भाजपने करून दाखवलेलं आहे.. सत्तेचा दुरुपयोग करून ही निवडणूक केलेली आहे.. त्याचा निषेध करतो, असं शशिकांत शिंदे म्हणाले.

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की,पोलीस भाजपचे मांडलिकत्व पत्कारल्यासारखं वागले आहेत. युतीच्यावतीनं पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचा धिक्कार करतो, निषेध करतो. समारोप करताना मी एवढंच सांगेन या प्रकरणाची सुरुवात भारतीय जनता पक्षानं केलेली आहे, पण याचा शेवट राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेनेची युती करेल.

सातारा जिल्हा परिषद एकूण संख्याबळ 65

भाजप – 27
राष्ट्रवादी – 20
शिवसेना – 15
काँग्रेस – 1
अपक्ष – 2

आजच्या निवडी मध्ये फुटलेले सदस्य

राष्ट्रवादी
लता कर्णे – (बुध, खटाव)
ऋतुजा जगताप – (फल्टन)
कामेश कांबळे – (सातारा)

अनिल देसाई (मान)
संदीप मांडवे  (खटाव)
पोलिसांनी जिल्हापरिषद परिसरातून सकाळी दाखल झालेल्या अपहरणाच्या गुन्ह्याखाली उचलून नेले

शिवसेना

हणमंत जगदाळे (कोरेगाव कुमठे)
सारिका फाळके (सातारा रस्ता)

भाजप – 33

शिवसेना /राष्ट्रवादी/स्वाभिमानी/ काँग्रेस – 30

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.