मलेशियाच्या पंतप्रधानांनी राहुल गांधी यांची भेट घेतली.
एकत्र नाश्ता : राहुल गांधींना संबोधिले ‘चांगला मित्र’
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या व्यतिरिक्त वेळ काढत मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी रविवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. यावेळी काँग्रेस नेत्या प्रियांका वड्रा देखील उपस्थित होत्या. तिघांनी एकत्र नाश्ता करत संवाद साधला. ही भेट नेमकी कुठे झाली याची माहिती मात्र समोर आलेली नाही. राहुल गांधी आणि पंतप्रधान इब्राहिम यांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अन्वर इब्राहिम यांनी राहुल गांधींना ‘चांगला मित्र’ संबोधित अलिकडील आंतराष्ट्रीय आणि प्रादेशिक घडामोडींवर चर्चा झाल्याचे सांगितले आहे. अन्वर इब्राहिम गेल्या 8 वर्षांत तीनवेळा भारत दौऱ्यावर आले असून प्रत्येकवेळी त्यांची राहुल गांधींसोबत भेट झाली आहे.
2019 मध्ये पहिली भेट
जानेवारी 2019 मध्ये नवी दिल्लीत राहुल गांधी आणि अन्वर इब्राहिम यांची पहिली भेट झाली होती. त्यावेळी अन्वर इब्राहिम हे मलेशियाचे पंतप्रधान नव्हते. ते पीकेआर पक्षाचे अध्यक्ष आणि देशाचे माजी उपपंतप्रधान म्हणून रायसीना डायलॉगमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आले होते. तर त्यावेळी राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते.
2024 मध्ये पंतप्रधान झाल्यावर भेट
21 ऑगस्ट 2024 रोजी मलेशियाच्या पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अन्वर इब्राहिम भारतात आले होते, त्यावेळीही त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर त्यांनी गांधी परिवाराला ‘फॅमिली प्रेंड़’ संबोधिले होते.
ब्रिक्स डिनरमध्ये गायन
अन्वर इब्राहिम हे 12-13 सप्टेंबर रोजी दिल्लीत आयोजित दोन दिवसीय ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाले आहेत. तर शनिवारी त्यांनी ‘समावेशक जागतिक प्रशासन आणि बहुपक्षीयतेला बळकटी’ या विषयावरील सत्रात सहभाग घेतला होता. याशिवाय त्यांनी ब्रिक्स देशांच्या नेत्यांसोबत वृक्षारोपण कार्यक्रमातही भाग घेतला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या डिनरमध्ये ते सहभागी झाले. यावेळी त्यांनी पियानोच्या साथीवर किशोर कुमार यांचे प्रसिद्ध ‘ख्वा हो तुम या कोई हकीकत’ हे गाणे गायले होते.
Comments are closed.