नाशिकनंतर मालेगावमध्येही महायुती तुटली; भाजप, शिवसेना अन् राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढणार
मालेगाव निवडणूक 2026: मालेगाव महापालिका निवडणुकीच्या (Malegaon Election 2026) पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे. मालेगावमध्ये भाजप-शिवसेना युती तुटली असून भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेने दिलेला जागावाटपाचा प्रस्ताव भाजपला अमान्य झाल्याने मालेगावमधील महायुती तुटल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मालेगाव महापालिकेच्या एकूण 22 जागांपैकी भाजपने 10 जागांची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र स्थानिक पातळीवर भाजपला केवळ 8 जागांवरच समाधान मानावे, असा प्रस्ताव पुढे आला. सन्मानजनक जागावाटप न झाल्याने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी होती. युती करण्यासंदर्भात पक्षांतर्गत खदखद सुरूच होती, अशी माहितीही समोर आली आहे.
Malegaon Election 2026: मालेगावमध्ये भाजप-शिवसेना युती तुटली
दरम्यान, नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या एका गटाने सुरुवातीपासूनच युतीला विरोध दर्शवला होता. या गटाने निवडणुकीत तटस्थ भूमिका घेण्याचा निर्णयही घेतल्याचे बोलले जात होते. या सर्व घडामोडींमुळे मालेगावातील महायुती अधिकच कमकुवत झाली आणि अखेर युती तुटण्याचा निर्णय झाला.
Malegaon Election 2026: मालेगाव महापालिका निवडणुकीत तिरंगी लढत
विशेष म्हणजे, नाशिकनंतर आता मालेगावातही भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती संपुष्टात आली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत आता तिरंगी लढत होण्याची शक्यता असून, राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. महायुतीतील तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याने मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांत राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Nashik Election 2026: नाशिकमध्येही महायुतीत फुट
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये जागा वाटपावरून मोठ्या प्रमाणामध्ये घडामोडी सुरू असल्याचे पाहायला मिळाले होते. नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर महायुतीमध्ये फुट पडल्याचे पाहायला मिळाले. नाशिकमध्ये भाजप विरोधात शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात झालेल्या युतीत शिवसेना शिंदे गटाकडे सर्वाधिक जागा असतील तर त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे असणार आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीतच लढत होणार असल्याचे पाहायला मिळत असून या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.