दोन्ही डावांत दिली नाही एकही धाव! मानव सुथारने रचला इतिहास, 131 वर्षांनंतर….

नुकतेच भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या फिरकीपटू मानव सुथारने त्याच्या रेड बॉल क्रिकेटमधील चमकदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. श्रीलंकेचे मैदान गाजवल्यानंतर तो इंग्लंडमध्ये पोहोचला. तेथे तो काउंटी क्रिकेटमध्ये वॉर्विकशायरकडून खेळत आहे. यादरम्यान त्याने ग्लॅमॉर्गन विरुद्ध अशी काही कामगिरी केली जी अनेक वर्षांपासून कोणालाही जमलेली नाही.
मानव श्रीलंका दौऱ्यातील अंतिम सामन्यानंतर तीन दिवसांनी इंग्लंडला रवाना झाला. त्याने काउंटी चॅम्पियनशीप 2026 च्या डिव्हिजन 1 च्या 58 व्या सामन्यात चकित करणारी गोलंदाजी केली आहे. त्याने ग्लॅमॉर्गनविरुद्धच्या त्या सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये एकही धाव न देता विकेट्स घेण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला.
कार्डिफच्या सोफिया गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यात वार्विकशायरने ग्लॅमॉर्गनचा एक डाव आणि 257 धावांनी पराभव केला. या सामन्यात ग्लॅमॉर्गनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा संघ पहिल्या डावात 69 धावसंख्येवरच सर्वबाद झाला. यामध्ये मानवने केवळ तीन चेंडू टाकले आणि एकही धाव न देता एक विकेट घेतली.
प्रत्युत्तरात वॉर्विकशायरने आपल्या पहिल्या डावात 391 धावा केल्या. तसेच ग्लॅमॉर्गनचा दुसरा डावही 65 धावांवरच संपुष्टात आला. यामध्ये मानवला दोन षटके टाकण्याची संधी मिळाली. त्याने या दोन्ही षटकांत एकही धाव न देता 2 विकेट्स घेतल्या. याप्रकारे त्याने या सामन्यात 2.3 षटकांत एकही धाव न देता 3 विकेट्स घेतल्या. ही एक ऐतिहासिक कामगिरी ठरली.
131 वर्षांनंतर घडले असे…
एका गोलंदाजाने दोन्ही डावांमध्ये एकही धाव न देता विकेट घेण्याची कामगिरी ही प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदाच झाली आहे. इंग्लंडच्या टॉम हेवर्डने 1895 मध्ये अशी कामगिरी केली होती. त्यांनी ओव्हलवर सरेविरुद्ध लीसेस्टरशायरकडून खेळताना सहा चेंडूंमध्ये केली होती. आता 131 वर्षांनंतर मानवने त्या कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे.
मानवने वॉर्विकशायरकडून आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 21 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा हा अनुभव आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी उपयोगी पडेल. (Manav Suthar rare County Championship Record Not a single run conceded across both innings and takes Wickets)
Comments are closed.