विराट कोहली पुन्हा विजय हजारे ट्रॉफीत खेळणार? DDCA अध्यक्षांनी केला मोठा खुलासा

विराट कोहलीने मागील हंगामातील विजय हजारे ट्रॉफीत सहभाग घेतला होता. तब्बल 15 वर्षांनंतर या स्पर्धेत पुनरागमन करताना कोहलीने दमदार फलंदाजी केली होती. आता पुन्हा एकदा विजय हजारे ट्रॉफीत विराट कोहलीचा जलवा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तो दिल्लीकडून या देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धेत खेळताना दिसू शकतो.

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे (DDCA) अध्यक्ष रोहन जेटली यांनी विराट कोहली पुन्हा एकदा दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत.

बीसीसीआयने आपल्या सर्व खेळाडूंना सामन्याच्या दृष्टीने फिट राहण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या मोठ्या खेळाडूंनी मागील हंगामात विजय हजारे ट्रॉफीत सहभाग घेतला होता. विराटने तब्बल 15 वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीत पुनरागमन केले आणि दिल्लीकडून दोन सामने खेळले.

विजय हजारे ट्रॉफी 2025-27 हंगामाला 14 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. विराट या स्पर्धेत खेळणार की नाही, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. यावर बोलताना DDCA अध्यक्ष रोहन जेटली यांनी मोठं वक्तव्य केलं.

त्यांनी सांगितले की, विराट कोहली जेव्हा उपलब्ध असेल आणि त्याच्या कामाचा ताण लक्षात घेता खेळणे शक्य असेल, तेव्हा तो पुन्हा दिल्लीकडून नक्की खेळेल. दिल्ली हे विराटचे घरचे क्रिकेट संघटन असून राज्यासाठी खेळण्याची त्याची बांधिलकी शानदार असल्याचेही जेटली यांनी म्हटले.

विराट कोहलीने मागील विजय हजारे ट्रॉफीत केवळ दोन सामने खेळले होते. आंध्र प्रदेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने 101 चेंडूंत 131 धावांची शानदार खेळी केली होती. यानंतर गुजरातविरुद्धच्या सामन्यात विराटने 61 चेंडूंत 77 धावा केल्या. अशा प्रकारे दोन सामन्यांत त्याच्या नावावर एकूण 208 धावा होत्या. टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुलनेने कमी सामने खेळायला मिळत आहेत. त्याचे प्रमुख लक्ष्य आता 2027 चा वनडे विश्वचषक आहे.

विश्वचषकासाठी स्वतःला पूर्णपणे तयार ठेवण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणे विराटसाठी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे तो पुन्हा विजय हजारे ट्रॉफीत खेळताना दिसण्याची शक्यता आहे. विराट कोहली सप्टेंबरच्या अखेरीस वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघाच्या जर्सीत पुनरागमन करणार आहे.

Comments are closed.