भिकारी शासन आहे, शेतकरी नाही; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर नेमकं काय म्हणाले कृषीमंत्री माणिकराव

मणक्राव कोकेटे: हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही. पण, आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा दिला, काही लोकांनी त्याचा गैरवापर केला, असे वक्तव्य काही महिन्यांपूर्वी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी केले होते. माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तर विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. आता माणिकराव कोकाटे यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

माणिकराव कोकाटे म्हणाले की, शेतकऱ्यांकडून एक रुपया शासन घेतं. शेतकऱ्यांना एक रुपया आम्ही देत नाही. म्हणजे भिकारी कोण आहे? शासन आहे, शेतकरी नाही. पण, त्याचा अर्थ उलटा केला. एक रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि त्या पिक विम्यामुळे महाराष्ट्रात पाच ते साडेपाच लाख बोगस अर्ज साडे अर्ज सापडले. माझ्याच काळात सापडले आहेत. मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या. आतापर्यंत कमीत कमी 52 जीआर निघाले, इतक्या घोषणा मी केलेल्या आहेत, असे त्यांनी म्हटले.

सहा महिन्यात कृषी विभागात मोठा बदल दिसेल

माणिकराव कोकाटे पुढे म्हणाले की, मी इतके नवीन कामे कृषी खात्यात केले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलोय. मी शेतात जाऊन आलो, बांधावर जाऊन आलो, अनेक संशोधन केंद्रात गेलो, ज्या संशोधन केंद्रात सुविधा नाहीत तिथे त्यांना सुविधा पुरवण्याचे मी आश्वासन दिले आहे. आतापर्यंत एकही कृषिमंत्री संशोधन केंद्रावर गेलेला नाही. मी विद्यापीठाला जाऊन भेटी दिल्या. शेतकऱ्यांशी जाऊन भेटलो, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारचे जीआर काढले. प्रत्येक गावात हवामान केंद्र तयार व्हावे, ही देखील माझीच मागणी आहे. शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत, त्या दूर करण्यासंदर्भात आपल्याला काय-काय करता येईल आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होईल? यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे. पुढील सहा महिन्यात मोठा बदल कृषी विभागात आपल्याला बघायला मिळेल. शंभर दिवसाच्या कार्यक्रमात तिसरा क्रमांक कृषी विभागाचा आलेला आहे, असा नंबर आपोआप येतो का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मला रमी खेळताच येत नाही

दरम्यान, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय. यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. याबाबत देखील माणिकराव कोकाटे यांनी वक्तव्य केले आहे. हा छोटा विषय आहे. हा विषय एवढा लांबला का? हे कळत नाही. ऑनलाइन रमी तुम्हाला माहिती आहे का? त्याला बँकेचे खाते जोडावे लागते. माझा असा कोणताही मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट ऑनलाईन रमीच्या अॅप्लिकेशनला जोडलेला नाही. कुठेही चौकशी करा. ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरु झाली आहे, तेव्हापासून मी एक रुपयाची रमी खेळलेली नाही. किंबहुना मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे माझ्यावरील आरोप बिनबुडाचा आहे. यामुळे माझी महाराष्ट्रात बदनामी झाली आहे. ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला आहे, ज्यांनी माझी बदनामी केली आहे, त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय मी राहणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी विरोधकांना दिला आहे.

https://www.youtube.com/watch?v=YS5WKL3IXHU

आणखी वाचा

Manikrao Kokate : मला जंगली रमी येत नाही, त्यासाठी मोबाईल नंबर, बँक अकाऊंट जोडावं लागतं, दोषी असेल तर राजीनामा देतो : माणिकराव कोकाटे

आणखी वाचा

Comments are closed.