12 सप्टेंबरपर्यंत मुंबईत धडक द्या! मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन
मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेत मुंबईत धडक देण्याचा इशारा दिला आहे. मी उपोषण सोडणार नाही आणि मुंबईला जाणारच, असा ठाम निर्धार व्यक्त करत जरांगे यांनी मराठा समाजबांधवांना 12 सप्टेंबरपर्यंत मुंबईत पोहोचण्याचे आवाहन केले आहे. यामुळे राज्यभरातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी शनिवारपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. सरकारकडून कितीही दबाव आला तरी आता मागे हटणार नाही. सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घ्यायचे नाही, असा निर्धार व्यक्त करत, मुंबईत निर्णायक आंदोलन करण्याची भूमिका आज जाहीर करत मराठा समाजाला मोठय़ा संख्येने मुंबईला पोहचण्याचे आवाहन केले.
थेट आझाद मैदानात जाऊ नका, नातेवाईकांकडे मुक्काम करा. 6 व 7 सप्टेंबरनंतर मुंबईकडे निघा. पुढील 12 तारखेपर्यंत मुंबईत जमावे. थेट आझाद मैदानात जाऊ नका. आपल्या नातेवाईकांकडे किंवा ओळखीच्या पाहुण्यांकडे मुक्काम करावा, अशा सूचना जरांगे यांनी दिल्या. सर्व मराठा बांधवांनी मुंबईत विभागून राहिल्यानंतर आझाद मैदान, इतर कोणतेही मैदान किंवा थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यापैकी नेमके कुठे जमायचे याचा निरोप मी स्वतः मुंबईत पोहचल्यावर तुम्हाला देईन. माझा निरोप मिळताच सगळय़ांनी त्या ठिकाणी एकत्र यायचे आहे, अशी रणनीती यांनी जरांगे सांगितली.
प्रमुख मागण्या
- राज्यामधील जात पडताळणी समित्या बरखास्त करा.
- निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीने शोधलेल्या 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे सर्वांना तत्काळ कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करा.
- हैदराबाद गॅझेटिअरच्या नोंदींनुसार मराठवाडय़ातील संपूर्ण मराठा समाजाला तत्काळ कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत.
- सगे-सोयरेबाबतच्या अधिसूचनेची तत्काळ अंमलबजावणी करा.
आम्ही तुम्हाला मोजत नाही
आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे असं आम्ही म्हटलं नाही. आम्ही तुम्हाला मोजत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांच्या चर्चेची दारं खुली आहेत, या वक्तव्याचा जरांगे यांनी समाचार घेतला. संविधानिक म्हणजे काय ते त्यांनाच माहीत. जे भ्रष्ट आहेत ते भाजपमध्ये आहेत. ते संविधानिक आहेत. ज्यांच्यावर काहीच आरोप नाहीत ते जेलमध्ये आहेत. त्यांच्यासाठी दोन संविधानिक असतात, असा टोला त्यांनी लगावला.
डॉक्टरांच्या रिपोर्टवर संशय
गेल्या दोन दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांची सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने सोमवारी तपासणी केली. तपासणीत त्यांची शुगर वाढली असल्याचे दिसून आल्याने त्यांना उपचार घेण्याचा सल्ला
डॉक्टरांनी दिला. त्यावर जरांगे यांनी माझ्या पोटात दोन दिवस अन्नाचा कण नाही तरी शुगर कशी वाढली, अशी विचारणा करत डॉक्टरांच्या रिपोर्टवर संशय व्यक्त करत उपचारास नकार दिला. तसेच हे सरकारचे षड्यंत्र तर नाही ना, असा सवालही त्यांनी केला होता. दरम्यान, डॉक्टरांच्या पथकाने ब्लड शुगरमध्ये झालेली वाढ ही नॉर्मल गोष्ट असल्याचं स्पष्ट करत त्यांचा संशय दूर केल्याची माहिती
डॉ. अमोल खवले यांनी दिली.
मराठे शिंदेंना संपवून टाकतील
जर 58 लाख नोंदी सापडलेल्या नाहीत तर एकनाथ शिंदेंनी स्पष्ट करावं किंवा देवेंद्र फडणवीस यांनी तसं सांगावं. शिंदेंनी तरी सांगावं की, मी फसवलेलं नाही. 58 लाख नोंदी सापडल्या आहेत. जर भाजपने अशा पद्धतीने नोंदी कमी केल्या तर मराठे शिंदेंना संपवून टाकतील. पक्षाशी ज्या पद्धतीने गद्दारी केली तशी आमच्याशी गद्दारी का केली, असे मराठे विचारतील. परभणीत आम्ही जर भिडलो असतो तर शिंदेना पळायलासुद्धा जागा राहिली नसती, असे जरांगे म्हणाले.
वाढता पाठिंबा
अंतरवाली सराटीत मराठा बांधवांचे लोंढे सतत दाखल होत आहेत. जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी जरांगे यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही भेट घेतली.
Comments are closed.