मराठा समाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मनोज जरांगेंचं मुंबईत आंदोलन सुरु असताना वेधलं लक्ष
मनोज जरेंगे पाटील मराठा मुंबई मोर्चा: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी कालपासून (29 ऑगस्ट) मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु केलं आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारशी लढा सुरू आहे. मनोज जरांगेंसह लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. याचदरम्यान महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीस शासनाने 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. एकीकडे मराठा समाजाचं आंदोलन सुरु असताना राज्य सरकारने मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 25 जानेवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये ही समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या कार्यकाळाला यापूर्वी 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर, मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आला होता. यास अनुसरून तालुकास्तरीय वंशावळ समितीस उच्चस्तरीय समितीच्या मुदतवाढीपेक्षा किमान सहा महिने अधिक मुदत देण्याचा विचार शासनाकडून करण्यात आला होता. त्यानुसार, आता या समितीचा कार्यकाळ 30 जून 2026 पर्यंत वाढविण्यात आला आहे. सदर समितीस 25 जानेवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयातील सर्व तरतूदी लागू राहतील, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
लाखो आंदोलक आझाद मैदानावर उपोषणासाठी दाखल-
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मराठा आंदोलनात सुरक्षेसाठी चार सुरक्षा पथक तैनात, मुंबई पोलीस, सीआयएसएफचे जवान, धडक कृती दलाचे पोलीस आणि सीआरपीएफचे जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेयत. आझाद मैदानात आंदोलनासाठी 5 हजार लोकांना परवानगी देण्यात आली होती, परंतु लाखो आंदोलक आझाद मैदानावर उपोषणासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनीही योग्य ती सुरक्षा व्यवस्था तैनात केलीय. मराठा आंदोलकांसोबत पोलीस अधिकाऱ्यांनी समजूतही घालण्याचा प्रयत्न केला.
https://www.youtube.com/watch?v=Q_jdohsatuo
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.