मराठा आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर BMC ला खडबडून जाग, तातडीने ‘या’ 10 सुविधा पुरवल्या

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. शुक्रवारी (२१ ऑगस्ट) मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर उपोषणास सुरुवात केली. या आंदोलनासाठी हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, उपोषणाच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील पावसाने आंदोलनकर्त्यांची मोठी परीक्षा घेतली. आझाद मैदानावर चिखल, पिण्याच्या पाण्याची व शौचालयाची कमतरता यामुळे आंदोलकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागला.

या परिस्थितीवर आंदोलकांचा रोष उसळला आणि शनिवारी सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाबाहेरील रस्त्यावर त्यांनी ठिय्या देत वाहतूक जवळपास चार तास रोखून धरली. त्यानंतर महापालिकेवर दबाव वाढला आणि आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आंदोलकांसाठी काही महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

आझाद मैदानात आंदोलकांसाठी महापालिकेकडून सुविधा उपलब्ध

महापालिकेकडून आझाद मैदानात करण्यात आलेल्या सोयी-सुविधांमध्ये सर्वप्रथम मैदानावर झालेला चिखल हटवून प्रवेशमार्ग समतल करण्यात आला आहे. यासाठी दोन ट्रक खडी टाकण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाशयोजना व्हावी यासाठी अग्निशमन दलाच्या मदतीने प्रखर झोताचे विद्युत दिवे उभारण्यात आले आहेत.

आंदोलनकर्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून 11 टँकर्स मैदानात आणले आहेत आणि अतिरिक्त टँकर्सही मागविण्यात आले आहेत. स्वच्छतेसाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करून सातत्याने साफसफाई केली जात आहे. आरोग्य सेवेसाठी मैदानात वैद्यकीय मदत कक्ष उभारण्यात आला असून, 4 वैद्यकीय पथके आणि 2 रुग्णवाहिका 24 तास कार्यरत आहेत. शिवाय, ‘108’ रुग्णवाहिका सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शौचालयाच्या समस्येवर महापालिकेने विशेष उपाययोजना केल्या आहेत. मैदानात 29 शौचकूप असलेले शौचालय विनामूल्य उपलब्ध आहे. याशिवाय महात्मा गांधी मार्गावर प्रत्येकी 10 शौचकूप असलेली 3 फिरती शौचालये, मेट्रो साइट शेजारी 12 पोर्टेबल शौचालये, तसेच फॅशन स्ट्रीट परिसरात मिळून तब्बल  250 फिरती शौचकूपे उभारण्यात आली आहेत. मैदानाबाहेरील सार्वजनिक शौचालयेही आंदोलकांसाठी मोफत खुली करण्यात आली आहेत.

पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील सुरू

पावसाळी परिस्थिती पाहता मैदान परिसरात कीटकनाशक फवारणीसाठी स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत. शिवाय, स्थानिक अधिकाऱ्यांकडून सातत्याने पाहणी व देखरेख केली जात आहे. आवश्यक असल्यास इतर कार्यालयांमधून अतिरिक्त अधिकारी व कर्मचारी बोलावले जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे, आझाद मैदान व परिसरातील उपाहारगृहे आणि खाद्यपदार्थांची दुकाने बंद करण्यात आलेली नाहीत. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील सुरू असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील हे उपोषण आता दुसऱ्या दिवशी पोहोचले असून, महापालिकेने उभारलेल्या सुविधांमुळे आंदोलकांना थोडा दिलासा मिळणार आहे. तथापि, मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकार नेमका काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा

Comments are closed.