IPL 2026- हार्दिक पंड्याकडून MI चे कर्णधारपद काढून पुन्हा रोहित शर्माकडे सोपवा, दिग्गज खेळाडूची मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इंडियन प्रीमियर लीग 2026 (IPL 2026) च्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक होत असून, कर्णधार हार्दिक पांड्या आता क्रिकेट तज्ज्ञांच्या निशाण्यावर आला आहे. हंगामातील पाच सामन्यांपैकी चार सामन्यांत पराभव पत्करावा लागल्याने मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाला फेकला गेला आहे. गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सने मुंबईचा सहज पराभव केला. मुंबईला या हंगामात आतापर्यंत केवळ कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध विजय मिळवता आला आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानचे माजी फलंदाज मनोज तिवारी यांनी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर टीका केली आहे.

क्रिकबझशी बातचीत करताना, मनोज तिवारी यांनी स्पष्ट केले की, जेव्हापासून हार्दिकने मुंबई इंडियन्सची धुरा सांभाळली आहे, तेव्हापासून त्याचे नेतृत्व सुमार दर्जाचे राहिले आहे. तिवारी यांच्या मते, संघात सध्या यशाची कमतरता असून केवळ चालू हंगामातील चुकाच नाही, तर मूळ कारणांचा शोध घेणे गरजेचे आहे. रोहित शर्माने 2013 ते 2023 या प्रदीर्घ काळात मुंबईला पाच वेळा विजेतेपद मिळवून दिले होते, याची आठवण करून देत तिवारी यांनी हार्दिकला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी केली आहे. 2015 ते 2023 या सुवर्णकाळात रोहितने संघाला ज्या उंचीवर नेले, तिथे पोहोचण्यात हार्दिक अपयशी ठरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तिवारी पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून मुंबईच्या पदरी निराशाच येत आहे आणि यावर्षीही परिस्थिती वेगळी दिसत नाही. हार्दिक पांड्या ज्या पद्धतीने संघाचे नेतृत्व करत आहे, ते पाहता त्याने स्वतःहून बाजूला होऊन रोहित शर्माकडे पुन्हा कर्णधारपद सोपवणे हाच एकमेव तोडगा आहे. रोहितला कर्णधारपदावरून हटवणे हा त्याच्यावर झालेला अन्याय होता, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. कर्णधार म्हणून मैदानावर पुढाकार घेण्यात हार्दिक कमी पडत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

नेतृत्वाव्यतिरिक्त, तिवारी यांनी पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात हार्दिकने घेतलेल्या डावपेचात्मक निर्णयांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. फलंदाजीच्या क्रमात शेर्फेन रदरफोर्डसारख्या फलंदाजाला मागे ठेवून हार्दिकने स्वतःला बढती देणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. हार्दिकने 12 चेंडूत 14 धावा केल्या, तर रदरफोर्डला केवळ 5 चेंडू खेळायला मिळाले. रदरफोर्डला अधिक संधी मिळाली असती तर सामन्याचे चित्र बदलले असते, असे तिवारी म्हणाले. तसेच, जसप्रीत बुमराहला पहिले षटक न देणे आणि चेंडू स्विंग होत नसतानाही दीपक चहरकडून गोलंदाजीची सुरुवात करून घेणे या निर्णयांवरही त्यांनी तीव्र टीका केली आहे.

Comments are closed.